कॅसिनोच्या निषेधार्थ सोमवारी रायबंदर बंदची हाक

0
81

भाजप नेता कॅसिनोचा भागीदार ः मडकईकर

यावेळी आमदार पांडुरंग मडकईकर म्हणाले की, एक भाजप नेता या कॅसिनोचा भागीदार आहे. त्याच्याविरुद्धचे पुरावे आपणाला मिळाल्यानंतर आपण त्याला उघडे पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॅसनोमुळे गोव्यात जुगार ङ्गोङ्गावला असल्याचा आरोपही यावेळी मडकईकर यांनी केला.

मांडवी नदीत रायबंदरजवळ नांगरून ठेवण्यात आलेले डेल्टिन कारावेला कॅसिनोचे जहाज तेथून हलवण्यात यावे या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ रायबंदर येथील नागरिकांनी येत्या २५ रोजी पूर्ण दिवस रायबंदर बंदची हाक दिली आहे. हे जहाज हटवण्यासाठी रायबंदरच्या नागरिकांनी सरकारला दिलेली मुदत उद्या संपत आहे, असे ऍड. आयरीश रॉड्रिग्स यांनी काल रायबंदर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, नगरसेवक रुपेश हळर्णकर आदींच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत रॉड्रिग्ज यांनी सांगितले की जर सरकारने वरील जहाज तेथून हलवले नाही तर त्याच्या विरोधात जे आंदोलन उभारण्यात येईल त्याला पूर्णतः सरकारच जबाबदार राहील.
मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो खोल समुद्रात पाठवण्याची गरज असून त्या मागणीसाठी गोवाभरातील नागरिक आंदोलन सुरू करतील, असा विश्‍वासही रॉड्रिग्ज यांनी यावेळी व्यक्त केला.
मगो अध्यक्षांचे अभिनंदन
दरम्यान, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी कॅसिनोंच्या विरोधात उघड भूमिका घेतल्याबद्दल रॉड्रिग्ज यांनी पत्रकार परिषदेतून त्यांचे अभिनंदन केले.
येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व आमदारांनी विधानसभेत कॅसिनोंचा मुद्दा उपस्थित करावा, असे आवाहनही आपण केले असल्याचे ते म्हणाले. भाजप नगरसेवक रुपेश हळर्णकर हे या प्रकरणी रायबंदर येथील जनतेबरोबर राहिल्याबद्दल अभिनंदनास पात्र असल्याचे त्यानी नमूद केले.
मनोहर पर्रीकर व भाजपने आमदारानी विरोधी बाकांवर असताना कॅसिनोंना विरोध केला होता. मात्र, सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ‘यू टर्न’ घेतल्याचे ते म्हणाले.