कॅसिनोंना सहा महिने मुदतवाढ

0
92

>> कॅसिनो धोरण नसल्याने मंत्रिमंडळाचा निर्णय ः डिसोझा

मांडवी नदीतील सहा तरंगत्या कॅसिनोंना सहा महिन्यांचा अवधी वाढवून देण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तरंगत्या कॅसिनोसंबंधीचे धोरण अद्याप सरकारने तयार केलेले नाही. त्यामुळे कॅसिनोंना आणखी सहा महिन्यांचा अवधी वाढवून देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी काल सांगितले. या कॅसिनोंची कुठे व्यवस्था करावी याचा निर्णय या तरंगत्या कॅसिनोंसंबंधीचे धोरण तयार झाल्यानंतरच होऊ शकणार असल्याचे डिसोझा यांनी स्पष्ट केले.

सरकारने मार्च २०१२ ला या तरंगत्या कॅसिनोंसंबंधीचे धोरण तयार करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. पण अजून हे धोरण तयार झाले नसल्याने काल परत एकदा या कॅसिनोंना मुदतवाढ देण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे डिसोझा म्हणाले.
दरम्यान, दोनापावल व करंजाळेसाठी सांडपाणी योजना मार्गी लावण्यासाठी पणजी शहरातील ३०७.०० चौ. मी. एवढी जमीन (चलता क्रमांक १८ ए.पी.टी.) व २२५ चौ. मी. जमीन (चलता क्रमांक ९ (भाग), पी.टी.शीट क्रमांक १७५ सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरित करण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

कंत्राटी नियुक्तीस मान्यता
दरम्यान, गोवा लोकसेवा आयोगात कनिष्ठ सहाय्य पदावर कंत्राटी पद्धतीवर सप्रेम शिरवईकर यांची नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली. ही नियुक्ती एका वर्षासाठी असून ६ जुलै २०१७ पासून ती होणार आहे.
गोवा राज्य व रशियातील कालिनीग्राड हा प्रदेश यांना जुळ्यांचा (ट्‌विनिंग) मान देण्याचा करार मान्य करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

कॅसिनोंना समुद्रात पाठवण्याचा
प्रश्‍नच नाही ः डिसोझा
या कॅसिनोंची जहाजे ही छोटी असल्याने ती समुद्रात तग धरू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना खोल समुद्रात पाठवण्याचा प्रश्‍नच नाही. त्यांना नेमके कुठे हलवावे हे कॅसिनो धोरणानंतरच स्पष्ट होणार असल्याचे डिसोझा म्हणाले.