टॅक्सी व्यावसायिकांनी घेतली मायकल लोबोंची भेट
ॲपआधारित टॅक्सीसेवा आणि कॅब ॲग्रीगेटर धोरणाच्या मुद्द्यावरून राज्यभरातील टॅक्सी व्यावसायिक पुन्हा एकदा आक्रमक बनले असून, काल कळंगुट व शिवोली या मतदारसंघातील टॅक्सी व्यावसायिकांनी आमदार मायकल लोबो व डिलायला लोबो यांची भेट घेतली व त्यांच्यासमोर कॅब ॲग्रीगेटर धोरणाला विरोध दर्शवला. पर्रा येथे झालेल्या चर्चेवेळी टॅक्सी व्यावसायिक व आमदारांमध्ये खटकेही उडाले. काही टॅक्सीचालकांनी आमदारांसमक्ष प्रस्तावित कॅब ॲग्रीगेटर धोरणाच्या राजपत्राची प्रत फाडून रोष व्यक्त केला. तसेच प्रसंगी आमदारांच्या दारावर बसून भीक मागणार, असा इशाराही टॅक्सीचालकांनी दिला. यावेळी बोलताना मायकल लोबो व डिलायला लोबो यांनी या टॅक्सी व्यावसायिकांना आपला पाठिंबा व्यक्त केला. तसेच त्यांचे जे म्हणणे आहे, ते सरकारच्या कानावर घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
ॲपआधारित टॅक्सी सेवा आणि कॅब ॲग्रीगेटर धोरणामुळे टॅक्सी व्यावसायिकांत असंतोष पसरला आहे. या धोरणामुळे आपला व्यवसाय धोक्यात येईल व परिणामी जगणे कठीण होईल, अशी चिंता टॅक्सी व्यावसायिकांनी मायकल लोबो व डिलायला लोबो यांच्यासमोर व्यक्त केली.
यासंदर्भात बोलताना टॅक्सीचालक नेते योगेश गोवेकर म्हणाले, कॅब ॲग्रीगेटरला आमचा कडाडून विरोध आहे. मुळात ॲग्रिगेटर धोरण हे पारंपरिक टॅक्सीचालकांची उपजीविका संपविण्यासारखे आहे. कॅब ॲग्रिगेटर धोरण चालीस लागल्यास आमचे अस्तित्व संपेल.
यावेळी बोलताना मायकल लोबो तसेच डिलायला लोबो यांनी या टॅक्सी व्यावसायिकांना आपला पाठिंबा व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी टॅक्सी व्यवसायातील काही चुकीच्या गोष्टी देखील समोर आणल्या. ग्राहक या नात्याने पर्यटक काय बोलतात, याची आम्हाला कल्पना आहे. त्यासाठी पारदर्शकता हवीच. राज्यात दर्जेदार व चांगले पर्यटक हवे असल्यास काही गोष्टी नियमानुसार व्हायला हव्यात, असेही मायकल लोबो म्हणाले.
.. तर राजकारण काय ते दाखवून देऊ
लोकप्रतिनिधींनी आम्हाला अपेक्षित साथ दिली नाही किंवा आमच्या तोंडाला पाने पुसल्यास, आगामी विधानसभेत राजकारण काय असते ते दाखवू. कोणीही टॅक्सीचालकांच्या उपजीविकेशी राजकारण करू नये, असा सज्जड इशारा संतप्त टॅक्सीचालकांनी यावेळी दिला. त्याचप्रमाणे, आमदारांनी तोडगा काढण्यासाठी आमची साथ न दिल्यास, आम्ही भविष्यात आमची रणनीती स्पष्ट करू आणि आमदारांच्या दारावर बसून भीक मागणार, असा इशारा जमलेल्या टॅक्सीचालकांनी दिला.