‘कॅब ॲग्रीगेटर’चा प्रश्न लवकरच सोडवू

0
3

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती

पावसाळी अधिवेशन 22 जुलैपासून

कॅब ॲग्रीगेटरबाबत टॅक्सीवाल्यांसह सर्वांना विश्वासात घेऊन लवकरच तो प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पर्वरी येथे मंत्रालयात ही पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेच्या वेळी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना टॅक्सी ॲप ॲग्रीगेटरबाबत छेडले असता त्यांनी वरील माहिती दिली.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळासाठी कंत्राटी पद्धतीवर 19 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तसेच 4 इएनटी सर्जनाची पदे भरण्यात मान्यता देण्यात आली. वनहक्क दाव्यांच्या खटल्यांशी संबंधित प्रकरणांचा सर्वे करण्यासाठी नव्या सर्व्हेअरचे पद भरण्याची मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

विधानसभेचे पावसाळी
अधिवेशन 22 जुलैपासून

गोवा मंत्रिमंडळाच्या काल बुधवारी झालेल्या बैठकीत गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या 22 जुलैपासून भरवण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. 22 जुलैपासून सुरू होणार असलेले राज्य विधानसभेचे अधिवेशन किती दिवस चालेल त्यासंबंधीची घोषणा नंतर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यातील गुंडगिरी व कायदा आणि सुव्यवस्था या प्रश्नावरून विरोधकांकडून सरकारवर जी टीका होऊ लागली आहे त्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे हा विरोधकांचा आरोप खोटा आहे. भांडण तंटे व एखादी हल्ल्याची घटना का घडते ते पाहणे महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, अशा घटना घडल्या की पोलीस विनाविलंब तातडीने कारवाई करीत असतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची जी घटना घडली आहे त्या प्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

चिंबलमध्ये युनिटी मॉल
चिंबल येथे होऊ घातलेल्या युनिटी मॉलच्या बांधकामासाठीच्या वर्क ऑर्डरला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्य सरकारच्या युनिटी मॉल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी चिंबल येथे लवकरच काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठीची ‘वर्क ऑर्डर’ जारी करण्यात आली असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. या युनिटी मॉलमध्ये हस्तकारांगिरांना स्थान मिळणार असल्याचे ते म्हणाले. मॉलमध्ये गोव्यातील विविध प्रकारच्या उत्पादनांना स्थान मिळणार आहे. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने या मॉलमध्ये पर्यटनविषयक माहितीही मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या मॉलचा फायदा राज्यातील उद्योगांनाही होणार आहे. तसेच हे मॉल पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र बनणार असल्याचा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यानी व्यक्त केला.

नव्या राज्य वारसा धोरणास मान्यता

मंत्रिमंडळ बैठकीत नवे राज्य वारसा धोरण 2025च्या अंमलबजावणीस मंजुरी देण्यात आली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यानी दिली. या धोरणाखाली राज्यातील सुमारे 200 ऐतिहासिक, पुरातन वास्तू व वारसा स्थळे तसेच सुमारे 100 खासगी वारसा घरे व सरकारी आणि सरकारी वारसा इमारती यांच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. राज्य वारसा धोरण 2025 चा मसुदा डिसेंबर 2024 ला जाहीर करण्यात आला होता. या धोरणाचा राज्यातील खासगी वारसा घरांना चांगला फायदा मिळणार असून या घरांच्या मालकांना घरांच्या संवर्धनासाठी सरकारकडून आर्थिक व तांत्रिक मदत मिळणार आहे. या वारसा धोरणाचा 46 लोककला तसेच 61 पारंपरिक व्यवसायांनाही फायदा होणार आहे.

4जी टॉवर्सना जमीन
देण्यास मान्यता

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वाघेरी, सत्तरी येथे तसेच सांगे येथे 4जी टॉवर्स उभारण्यासाठी जमीन देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच मांद्रे पंचायत क्षेत्रात स्मशानभूमीसाठी 2000 चौ.मी. एवढी जमीन मंजूर करण्यात आली.

आक्षेपांची मुदत संपल्यानंतर
टॅक्सी चालकांशी बोलणार

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो

वाहतूक ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यावर आक्षेप आणि सूचनांची अंतिम मुदत संपल्यानंतर टॅक्सी मुद्द्यावर टॅक्सी चालक आणि इतर भागधारकांशी चर्चा करण्याची तयारी आहे, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.
गोवा वाहतूक ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्वे 2025 चा मसुदा 20 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आला आणि संबंधितांना त्यांचे आक्षेप आणि सूचना देण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. सरकार टॅक्सी चालकांच्या विरोधात नाही. जर त्यांना हवे असेल तर ते त्यांचे स्वतःचे ॲपदेखील ते सुरू करू शकतात, असेही मंत्री म्हणाले. मसुदा मार्गदर्शक तत्त्वे अंतिम करण्यापूर्वी पक्ष आणि मंत्रिमंडळाद्वारे त्यांचा आढावा घेतला जाणार आहे. राज्यात सुरळीत वाहतूक आणि टॅक्सीशी संबंधित मुद्द्यांच्या नकारात्मक प्रसिद्धीला आळा घालणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

आमदार लोबोंचा यू टर्न
आमदार मायकल लोबो यांनी टॅक्सी ॲग्रीगेटर प्रश्नी यू टर्न घेतला असल्याची टीका मंत्री गुदिन्हो यांनी केली. लोबो यांनी टॅक्सी ॲग्रीगेटरला प्रथम पाठिंबा दिला होता. आता, आपले वक्तव्य बदलले आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.