कॅपिटल्सचा ‘रॉयल’ विजय

0
114

शिखर धवन व पृथ्वी शॉ यांच्या भक्कम सलामीनंतर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने काल सोमवारी यजमान राजस्थान रॉयल्सचा ६ गडी व ४ चेंडू राखून पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा ४०वा सामना सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळविण्यात आले. राजस्थानने विजयासाठी ठेवलेले १९२ धावांचे विशाल लक्ष्य दिल्लीने १९.२ षटकांत गाठले. पराभवामुळे राजस्थानच्या अजिंक्य रहाणेने ठोकलेले शतक व्यर्थ ठरले तर धवन व पंत यांची अर्धशतके संघाच्या विजयात कामी आली.

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रहाणेसोबतच्या समन्वयाच्या अभावामुळे सलामीवीर संजू सॅमसन एकही चेंडू न खेळता शून्यावर धावबाद झाला. प्रारंभीच्या या धक्क्यातून संघाला सावरण्याचे काम रहाणे व स्मिथ यांच्या भागीदारीने केले. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी १३० धावांची भागीदारी रचली. स्मिथ परतल्यानंतर रहाणेने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. तब्बल सात वर्षांनंतर रहाणेने आपले आयपीएल शतक ठोकले. यापूर्वी २०१२ साली त्याने शतकी वेस ओलांडली होती. राजस्थानचा संघ दोनशेचा टप्पा सहज पार करेल असे वाटत असताना दिल्लीच्या गोलंदाजांनी ‘डेथ ओव्हर्स’मध्ये भन्नाट मारा करत राजस्थानचा डाव १९१ धावांपर्यंत मर्यादित ठेवला.

धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ प्रारंभापासून विजयासाठी खेळत असल्याचे दिसून आले. केवळ ७.३ षटकांत ७२ धावांची भक्कम सलामी मिळाल्याचा लाभ दिल्लीला झाला. कर्णधार श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाला तरी धवनच्या पतनानंतर पृथ्वीने पंतसह तिसर्‍या गड्यासाठी ८४ धावांची भागीदारी केली. पंतने यानंतर आपला आक्रमक खेळ कायम राखत धवल व उनाडकट यांची गोलंदाजी टार्गेट केली. जोफ्रा आर्चरने टाकलेल्या १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून पंतने विजयासाठीचे समीकरण चेंडूगणिक धाव असे केले. विसाव्या षटकातील दुसर्‍या चेंडूवर षटकार लगावत पंतने संघाचा विजय साकार केला.

धावफलक
राजस्थान रॉयल्स ः अजिंक्य रहाणे नाबाद १०५ (६३ चेंडू, ११ चौकार, ३ षटकार), संजू सॅमसन धावबाद ०, स्टीव स्मिथ झे. मॉरिस गो. पटेल ५० (३२ चेंडू, ८ चौकार), बेन स्टोक्स झे. अय्यर गो. मॉरिस ८, ऍश्टन टर्नर झे. रुदरफर्ड गो. शर्मा ०, स्टुअर्ट बिन्नी त्रि. गो. रबाडा १९, रियान पराग त्रि. गो. रबाडा ४, अवांतर ५, एकूण २० षटकांत ६ बाद १९१
गोलंदाजी ः इशांत शर्मा ४-०-२९-१, कगिसो रबाडा ४-०-३७-२, अक्षर पटेल ४-०-३९-१, अमित मिश्रा ३-०-२८-०, ख्रिस मॉरिस ४-०-४१-१, शर्मेन रुदरफर्ड १-०-१६-०
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. पराग गो. गोपाळ ४२, शिखर धवन यष्टिचीत सॅमसन गो. गोपाळ ५४, श्रेयस अय्यर झे. स्टोक्स गो. पराग ४, ऋषभ पंत नाबाद ७८ (३६ चेंडू, ६ चौकार, ४ षटकार), शर्मेन रुदरफर्ड झे. पराग गो. कुलकर्णी ११, कॉलिन इंग्राम नाबाद ३, अवांतर १, एकूण १९.२ षटकांत ४ बाद १९३
गोलंदाजी ः स्टुअर्ट बिन्नी १-०-३-०, धवल कुलकर्णी ४-०-५१-१, जयदेव उनाडकट ३.२-०-३६-०, श्रेयस गोपाळ ४-०-४७-२, जोफ्रा आर्चर ४-०-३१-०, रियान पराग ३-०-२५-१