बॉलिवूड चित्रपटांना कॅनडामध्ये चांगले मार्केट मिळू शकते. भारताने त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अक्षयकुमार या भारतातील स्टार अभिनेत्याचे कॅनडामध्ये चांगले स्वागत झाले होते. संगीत, नाच, गाणी यांचा समावेश असलेले हिंदी चित्रपट कॅनडातील जनतेला भूरळ घालू शकतात, असे कॅनडाचे मुंबईस्थित राजदूत जॉर्डन रिव्हिस यांनी काल येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
यंदाच्या इफ्फीत कंट्री लोकससाठी कॅनडाची निवड झाल्याचे योळी नमूद केले. भारत व कॅनडा यांच्यात चित्रपटांच्या सहनिर्मितीसाठी करार झालेला आहे. त्याच्या जोडीला आता सहनिर्मिती या विषयावर एक चर्चासत्रही झाल्याचे ते म्हणाले. इफ्फीतील फिल्म बझारचाही कॅनडाला फायदा झाला. कॅनडातर्फे भारतात दोन चित्रपट प्रशिक्षण विद्यालयेही सुरू करण्याचे ठरले आहे, असेही रिव्हिस यांनी यावेळी स्पष्ट केले.
इफ्फीतील एक आठवडा हा खरोखरच आमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. भारताबरोबर जास्तीत जास्तीत चित्रपटांसाठी सहनिर्मिती करण्यास कॅनडा उत्सुक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. इफ्फीत त्या संदर्भातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
२०१६ साली कॅनडाने विविध राष्ट्रांबरोबर ५८ चित्रपटांसाठीची सहनिर्मिती केली. २.६ अब्ज डॉलर्स एवढा खर्च त्यासाठी आल्याचे यावेळी रिव्हिस यांनी स्पष्ट केले.