राज्य सरकारने कला अकादमीच्या नूतनीकरण प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 13 सदस्यीय कृती दलाची पहिली बैठक येत्या 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कांपाल येथील गोवा मनोरंजन संस्थेच्या परिषद सभागृहात घेतली जाणार आहे. या पहिल्या बैठकीपूर्वी सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजता कृती दलाच्या सदस्यांकडून कला अकादमी संकुलाची पाहणी केली जाणार आहे, अशी माहिती कृती दलाचे सदस्य सचिव तथा बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता संतोष म्हापणे यांनी दिली.
राज्य सरकारने कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्यासाठी ज्येष्ठ नाट्य कलाकार विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल स्थापन केले आहे.
सुमारे 70 कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आल्यानंतरही कला अकादमीमध्ये अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत. कला अकादमीचा विषय विधानसभेत सुध्दा गाजला होता. त्यामुळे कला अकादमीतील त्रुटींचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणांसाठी सूचना करण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात
आली आहे.