कूळ-मुंडकार प्रकरणांचा जलदगतीने निपटारा

0
3

>> महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती; 91 प्रकरणे निकालात

राज्यातील प्रलंबित कूळ आणि मुंडकार प्रकरणे निकालात काढण्यास गती देण्यात आली आहे. मामलेदार कार्यालयात कूळ, मुंडकार प्रकरणे हाताळण्यासाठी खास मामलेदारांची नियुक्ती करण्यात आली असून, शनिवारी सुध्दा कूळ, मुंडकार प्रकरणी सुनावणी घेतल्या जात आहेत, अशी माहिती महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी विधानसभेत आमदार केदार नाईक यांच्या खासगी ठरावावर बोलताना काल दिली.

राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी कूळ, मुंडकार प्रकरणाच्या सुनावणीला गती देण्यासाठी खास आदेश जारी केलेला आहे. शनिवारच्या दिवशी सुनावणी घेऊन सुमारे 91 प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. राज्यात कूळांची 2485 प्रकरणे आणि मुंडकारांची 2059 प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी माहिती मोन्सेरात यांनी दिली.

कूळ, मुंडकारांची प्रकरणे प्रलंबित असल्याने नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. कूळ, मुंडकारांना न्याय देण्यासाठी कायदा कार्यान्वित केलेला आहे; पण मामलेदार कार्यालयात प्रकरणांना गती मिळत नाही, अशी खंत केदार नाईक यांनी व्यक्त केली.
कूळ, मुंडकार प्रकरणे जलदगतीने निकालात काढण्यासाठी या प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी खास देखरेख यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे. तसेच, मामलेदार कार्यालयात आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध केला पाहिजे. प्रकरणांच्या सुनावणीसाठी तारीख पे तारीख ही परिस्थिती बदलली पाहिजे, असे डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले.
कूळ, मुंडकार प्रकरणे तातडीने हातावेगळी करण्यासाठी संबंधित मामलेदाराला अन्य कोणतेही काम देता कामा नये, असे नीलेश काब्राल यांनी सांगितले.