कूळ – मुंडकार खटले तातडीने निकाली काढा

0
11

>> आमदार डिलायला लोबो यांची मागणी

पूजा शर्मा हिच्या आसगाव येथील जमिनीच्या म्युटेशनची प्रक्रिया केवळ एका दिवसात, ती सुध्दा रविवारी पूर्ण करण्यात आलेली आहे. तर, स्थानिकांच्या कूळ, मुंडकार, म्युटेशन प्रकरणे कित्येक वर्षे प्रलंबित ठेवली जात आहेत. त्यांना केवळ तारीख पे तारीख दिली जाते. त्यांची प्रकरणे तातडीने का निकालात काढली जात नाहीत, असा प्रश्न शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी विधानसभा सभागृहात महसूल व इतर खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना काल केला. स्थानिकांचे कूळ, मुंडकार खटले गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. प्रलंबित कूळ, मुंडकार खटले तातडीने निकालात काढण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना वेळेचे बंधन घालावे, अशी मागणी आमदार डिलायला लोबो यांनी केली.

घरा शेजारी असलेले धोकादायक झाड तोडण्यासाठी जमीन मालक तयार होत नाहीत. अशा प्रसंगी धोकादायक झाड कुणी तोडायचे याबाबत सरकारी पातळीवरून स्पष्टीकरणाची गरज आहे, असेही आमदार श्रीमती लोबो यांनी सांगितले.

कर्मचारी कामचुकार : व्हेंझी
महसूल विभागातील जिल्हाधिकारी व इतर सरकारी कार्यालयांतून नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेवा वेळेवर उपलब्ध करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे, असे आमदार व्हेन्झी व्हिएगश यांनी सांगितले.
उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत जुनी झालेली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयासाठी नवीन इमारत बांधण्याची गरज आहे. दक्षिण गोव्यात जिल्हाधिकारी कार्यालयासाठी इमारत आहे. त्यासाठी साधन सुविधांचा अभाव आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय दुर्लक्षित आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये अनेक त्रुटी आढळून येत आहेत. शेत जमिनीमध्ये मातीचा भराव घालून बुजविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याबाबत तक्रार केल्यास योग्य दखल घेतली जात नाही, असेही आमदार व्हिएगश यांनी सांगितले.

कूळ, मुंडकारांना
दिलासा द्या : साळकर

राज्यात कूळ, मुंडकारांचे खटले गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. खटले जलदगतीने निकालात काढून कूळ, मुंडकारांना दिलासा देण्याची गरज आहे. मामलेदार कार्यालयांतून कूळ, मुंडकारांना तारीख पे तारीख दिल्या जात आहेत. मामलेदार कार्यालयात अधिकारी वर्गावर कामाचा ताण असल्याने कूळ, मुंडकार खटले निकालात काढण्याकडे योग्य वेळ देऊ शकत नाही. कूळ, मुंडकार प्रकरणांसाठी खास अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार कृष्णा साळकर यांनी केली.
मुरगाव तालुक्यातील सरकारी कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मुरगावातील सर्व सरकारी कार्यालये एका छताखाली आणण्याची गरज आहे. कोमुनिदादच्या जमिनीमध्ये सरकारी इमारत उभारली जाऊ शकते, असे आमदार साळकर यांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्ती नुकसान;
भरपाईत वाढ करा : कामत

नैसर्गिक आपत्तीवेळी नुकसान भरपाई पोटी दिल्या जाणाऱ्या रक्कमेत वाढ करण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी या महत्त्वपूर्ण कार्यालयात नागरिकांची कामे वेळेवर पूर्ण झाली पाहिजेत. जिल्हाधिकारी व इतर कार्यालयांत विविध कामांसाठी नागरिकांना हेलपाटे घालावे लागतात. या परिस्थितीत सुधारणा होणे गरजेचे आहे, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.