मंत्री तवडकर, गणेश गावकर यांचे मत
सरकारने कूळ व मुंडकार कायद्यात केलेली दुरस्ती कूळ व मुंडकारांच्या हितासाठीच आहे. काही मंडळी व ‘उटा’चे नेते विनाकारण दिशाभूल करीत आहेत, असे क्रीडा मंत्री रमेश तवडकर व आमदार गणेश गावकर यांनी सांगितले. कूळ-मुंडकारांची प्रकरणे मामलेदारांकडून दिवाणी न्यायालयात नेण्यासाठी एकमेव दुरुस्ती कायद्यात केली आहे. ती कूळ-मुंडकारांच्या हितासाठीच आहे. तीस वर्षांपासून अधिक काळ ही प्रकरणे मामलेदारांच्या कोर्टात रखडत पडली आहेत त्यामुळे लोकांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळेच दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी प्रकरणे फोंडा व तिसवाडी भागात अधिक प्रमाणात आहेत. प्रकरणे हस्तांतरीत झाल्यानंतर कोर्टात वकील करावा लागेल ही भीती बाळगण्याचे कारण नाही, गरज भासल्यास सरकार वकील देईल, असे तवडकर म्हणाले.