कूळ कायद्यातील दुरूस्ती मागे घ्या : वाघ

0
103

सांत आंद्रेचे भाजप आमदार विष्णू वाघ यांनी आपल्याच सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असून कूळ कायद्यातील दुरूस्ती मागे घ्यावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पाठवलेल्या पत्रात सध्या त्या दुरुस्तीसंदर्भात निर्माण झालेल्या असंतोषाची परिणती मोठ्या जनआंदोलनात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही कायदा दुरूस्ती रद्द केली नाही, तर आपल्या सरकारवर ‘बामणशाही व भाटकारशाही यांना संरक्षण दिल्याचा’ ठपका येईल असेही वाघ यांनी पत्रात नमूद केले आहे. सदर दुरूस्ती आगामी विधानसभा अधिवेशनात रद्द करावी अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.दरम्यान, काल त्यांनी एक लेख नवप्रभेसाठी लिहिला असून (आजच्या अंकात पान ६ वर वाचावा) त्यात आपण गेली अडीच वर्षे आपल्या बंडखोर व बेधडक स्वभावाला मुरड घातली, पण आता स्वतंत्र व्हायचे ठरवले आहे असा गर्भीत इशारा दिला आहे. आपल्याला माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते, परंतु ते पाळले नाही. बहुजन समाजातून आलेली प्रतिभा चिरडण्याचेच प्रयत्न राजकारणात होतात अशी टीकाही वाघ यांनी सदर लेखात केली आहे.
गोवा मनोरंजन संस्थेत आपली नेमणूक केली गेली, तेव्हा तेथे आपण घेतलेला प्रत्येक निर्णय फिरवला गेला, कलाकारांची पैशांसाठी अडवणूक केली गेली, असा आरोपही वाघ यांनी केला आहे. आपल्यावरील हल्लेखोरांची सरकारने पाठराखण केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. यापुढे आपण कोठे अन्याय होताना दिसला तर त्याविरुद्ध बोलत राहीन असा इशारा वाघ यांनी दिला आहे.