
जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रीपदी शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपला येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये रोखण्यासाठी देशातील सर्व भाजपविरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी या सोहळ्याच्या ठिकाणी शक्तीप्रदर्शन केले. कुमारस्वामी युती सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, नेत्या सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, सीताराम येच्युरी, अजित सिंग, शरद यादव, चंद्राबाबू नायडू, कमल हसन या नेत्यांनी सोहळ्याच्या व्यासपीठावर येत उपस्थितांसह देशातील जनतेला हात उंचावून अभिवादन केले. यानिमित्ताने भाजपविरोधक आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकसंध होत असल्याचा संदेश गेल्याची राजकीय निरीक्षकांत चर्चा सुरू झाली आहे.
त्याआधी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत राज्य विधानसभा संकुलाबाहेरील भव्य सोहळ्यात राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची तर कॉंग्रेसनेते परमेश्वरन यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या दोघांनाच यावेळी शपथ देण्यात आली. उद्या बहुमत चाचणी विधानसभेत होणार असून त्यानंतर अन्य मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
या सोहळ्यादरम्यान परस्परांच्या कडव्या विरोधक मानल्या जाणार्या मायावती व सोनिया गांधी यांनी एकमेकींची गळाभेट घेत दिलखुलास संवाद साधला. राहुल गांधी, अखिलेश यादव व माकप नेते सीताराम येच्युरी यांनी या सर्व नेत्यांना प्रसारमाध्यमांसमोर छायाचित्रांसाठी एकमेकांना बोलावून एकत्र आणले. बिहारात भाजपमुळे सत्ता गमावलेल्या लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव तसेच त्यांचे समर्थक शरद यादव हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला उध्वस्त करू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दिग्गज विरोधी नेत्यांची मांदियाळी कालच्या सोहळ्याला उपस्थित राहिली तरी संभाव्य आघाडीचा नेता कोण असेल, त्यांच्यातील पराकोटीच्या मतभेदांचे काय, निवडणुकीपर्यंत त्यांची एकी टिकेल काय या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रतिक्षा करावी लागेल, असेही राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
युती सरकार उत्तम प्रशासन देईल ः कुमारस्वामी
नवनियुक्त मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोणत्याही एकाच पक्षाच्या सरकारपेक्षाही आपले जेडीएस व कॉंग्रेस यांचे युती सरकार उत्तम प्रशासन देईल. राज्याच्या हितासाठी काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे ते म्हणाले.