कुंकळ्ळी नगरपालिकेची कारवाई : शेतीही केली नष्ट
कुंकळ्ळी येथे बसस्थानकासमोरील कृषी आणि बागायती जमीन, रस्ता रुंदीकरणासाठी कुंकळ्ळी पालिकेने काल पोलिस संरक्षणात ३० माड कापून टाकले. त्यावेळी जमीन मालक विष्णू देसाई व कुटुंबियांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी बळजबरीने त्यांना पकडून दूर नेले व बुलडोझर घालून माड कापले.रस्ता रुंदीकरणासाठी १० मिटर रुंदीची कृषी जमिनीत काल सकाळी बुलडोझर घालून जमीन समपातळीवर आणण्याचे काम सुरु केले. त्या जमिनीत भाताची लागवड केली होती. तर तीस माड होते. व ते माड भरपूर नारळ देणारे होते. या कारवाईमूळे विष्णू देसाई व कुटुंबियांच्या डोळ्यांतून अश्रु वाहू लागले.
ही जमीन रस्ता व इतर प्रकल्पासाठी तत्कालीन नगर विकासमंत्री ज्योकीम आलेमांव मंत्री असताना ताब्यांत घेतली होती. त्याविरुध्द कोर्ट कचेर्या झाल्या व शेवटी विष्णू देसाई यांनी उपोषण केले होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे तक्रार पोहचताच प्रकल्प होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले होते व त्याला शेती बागायती करण्यास परवानगी दिली होती. आता भाताचे पीक येताच पालिकेने जमीन संपादन करण्याचे काम पोलिस संरक्षणात सुरू केले त्यावेळी वातावरण बरेच तंग बनले. मडगांवहून पोलिस बंदोबस्त नेला होता. रस्त्यासाठी कारवाई केली जाईल याची कल्पना विष्णू देसाई यांना दिली नाही. गेल्या चार वर्षांपासून प्रकरण चालू असताना पालिकेचे मुख्याधिकारी पंढरीनाथ नाईक यानी ही कारवाई केल्याने कित्येकानी संताप व्यक्त केला. सायंकाळी उशीरापर्यंत तेथे पोलिस तैनात होते. या रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबर प्रशासकीय इमारत व पार्किंगसाठी इमारत बांधण्याचा पालिकेचा विचार आहे.