किर्तनसम्राज्ञी ह. भ. प. राधाबाई कामत

0
177

– गोविंद काळे

संकीर्त्यमानो भगवाननन्तः
श्रुतानुभावो व्यसनं हि पुंसाम्
प्रविश्य चित्तं विधुनोत्यशेषं
यथा तमोऽर्कोऽभ्रमिवाति वातः

भगवंताचे नामसंकीर्तन केल्याने वा ऐकल्याने भगवंत वक्त्याच्या आणि श्रोत्यांच्या अंतःकरणात प्रवेश करून सर्व पाप धुवून टाकतात. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाने काळोख आणि जोरदार वार्‍यामुळे ढग नष्ट होऊन जातात.

द्वादशीनगरी म्हणजे बार्शी. राजा अंबरीशाच्या भगवंतभक्तीने आणि जोगा परमानंदाच्या समाधीने पावन झालेले भगवंत मंदिर जगाच्या पाठीवर दुसरे नाही. शाळीग्रामाची सुंदर मूर्ती. भगवंताच्या पाठीला आहे लक्ष्मीची मूर्ती. पुढ्यात भगवंत आणि कोपर्‍यात ठेवलेल्या आरशात पाहिले तर लक्ष्मी. शाहीर

रामजोशींनी ‘बायकोला पाठीवर घेऊन जग प्रवासाला निघालेला भगवंत..’ असे या मूर्तीचे वर्णन केले आहे. द्वादशीला भगवंताचे महत्त्व. गेले आठ दिवस सायंकाळच्या वेळी देवळात प्रचंड गर्दी. देवळात आले तर भगवंताचे दर्शन घेता येणे कठीण. सभामंडप, बाहेरील ओवर्‍या, मंदिराचा प्राकार, श्रोत्यांनी खचाखच भरलेला. उभे रहायला जागा नाही. प्रत्येकाच्या मुखी एकच भाषा, ‘गोव्याहून कोणी राधाबाई कामत नावाच्या कीर्तनकार आल्या आहेत. वेळप्रसंगाला पायात चाळ बांधून नाचसुद्धा करतात. पायात चाळ घालून कीर्तन हा प्रकार बार्शीकरांना नवीनच होता. शिवाय गोव्यातील कीर्तनकार म्हणून श्रोत्यांना वेगळे आकर्षण होतेच. गेली तीन दिवस माईंनी ‘राजपुत्र सुदर्शन चरित्र’ हे आख्यान लावले होते.

‘मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे
दुर्बल या हृदयातुनी, चंचल या चित्तातुनी
झुरझुरत्या नेत्रातूनी, रूप पाहु दे
मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे’

माई! आपल्या सुरेल आवाजात संत तुकडोजी महाराजांचे पद आळवीत होत्या. त्यांच्या आवाजात गोडवा होता. आळवणीमध्ये कारुण्यभाव होता.

‘भवसागर कठीण घोर, षड्‌रिपु हे करिती जोर
तुकड्याचि नाव पार, स्थिर होऊ दे’

पद पूर्ण झाले. माईंच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. श्रोत्यातील वृद्ध मंडळी धोतराच्या सोग्याने डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसत होत्या. बायकांनी पदर डोळ्याला लावला होता. सारे वातावरण गंभीर. गोव्याच्या माईंचे किर्तन रंगात येऊ लागले. दोन तास केव्हा निघून गेले ते कळलेच नाही. भक्तिभाव विश्‍वात सारेच तल्लीन झाले होते. आख्यानाचा समारोप माईंनी भारत देशाची महती गाणार्‍या एका श्‍लोकाने केला.

‘मानुषं दुर्लभ मातः खण्डेऽस्मिन् भारते शुभे
आहारादि सुखं नूनं, भवेत् सर्वाषु योनिषु|
प्राप्तं मानुषं देहं कर्तव्यं धर्मसाधनात्
स्वर्गमोक्षपदं नृणाम् दुर्लभं चान्ययोनिषु॥

कोणत्याही योनीमध्ये आहारादि सुख प्राप्त होतच असते. परंतु या पुण्यपावन भरत खंडात मनुष्यजन्म प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ होय. भरत खंडात जन्मास आलेल्याने धर्माचरण करीत असावे. स्वर्ग व मोक्षरुप देणारे धर्मसाधन अन्य योनीमध्ये दुर्लभ आहे. याकरिता मनुष्यजन्म प्राप्त झाल्यावर ते साधन अवश्य करावे. माईंनी ‘आपुलिया बळे नाही बोलवत’ हा संतशिरोमणी तुकाराम महाराजांचा अभंग भैरवीतून गायिला. ‘‘पुंडलीक वरदा हरि विठ्ठल| श्री नामदेव तुकाराम| पार्वतीपते हरहर महादेव| श्री गुरुदेव दत्त| अंतरीश वरदश्री भगवंत| बाल गोपाल की जय|’’.. म्हणून किर्तनाची समाप्ती केली. दोन अडीच तास कसे संपले याचे भान कोणालाच नव्हते. माईंनी झांझ खाली ठेवली. अपार आनंदात न्हाऊन निघालेल्या श्रोत्यांनी माईंच्या चरणकमलावर मस्तक टेकविण्यासाठी ही गर्दी केली. बडव्यांनी माईंना प्रसादवस्त्रे दिली. श्रोेते कुजबुजत होते- असे कीर्तन, असे श्रोते पुन्हा होणे कठीण. अभिप्राय बोलका होता.
माईंची सारीच कीर्तने भक्तिभावरसाने ओथंबलेली असत. श्रोत्यांच्या काळजाला हात घालण्याचे वक्तृत्व कौशल्य माईंकडे होते. श्रोत्यांना महत्पदी विराजमान करून स्वतःकडे लीनभाव घेऊन माई आपल्या कीर्तनाची सुरुवात करीत. ‘‘थोर संतसज्जनांच्या समुदायात माझ्यासारख्या अशिक्षित अबलेने काय बरे बोलावे? परंतु समर्थांच्या उक्तीला अनुसरून मी तुम्हा संतसज्जनांचे, बंधुभगिनी, मायबापाचे एक लहानसे लेकरू, काहीतरी लहानतोंडी मोठा घास घेऊन, काहीतरी वेडेवाकुडे बोलते आहे व कीर्तन संपेपर्यंत बोलणार आहे. मी कुठेही चुकले अथवा घसरले तरी आपण सर्व संतसज्जन, बंधुभगिनी, मायबाप व हे माझे साथीदार यांच्यासह मला सर्व सांभाळून घ्याल अशी मला पूर्ण आशा आहे’’.
ज्ञानदेवांनी केलेल्या श्रोत्यांच्या विनवणीचे स्मरण व्हावे असे माई गोड शब्दांत श्रोत्यांना आपलेसे करून संवाद साधत. एकदा आलेला श्रोता दुसर्‍या दिवशी कीर्तनास येताना आपल्या बरोबर मित्रमंडळींना, सग्यासोयर्‍यांना घेऊन येई. त्यामुळे ‘वाढता वाढता वाढे ही गर्दी’ असे होई.
माई कीर्तनासाठी जेथे जेथे म्हणून गेल्या तेथे असाच श्रोत्रवर्ग उभा केला. आपल्या कीर्तनातून अनेकांना सन्मार्गाला लावले. पतिपत्नीचे हेवेदावे मिटून अनेकांचे संसार सुखाचे झाले. कीर्तनाला पर्याय नाही, हे माईंनी सिद्धच केले.
कीर्तनसम्राज्ञी, भक्तिविजया, कीर्तनतेजस्विनी, गोमंत सौदामिनी अशा विविध उपाधी लाभलेल्या राधाबाई कामत म्हणजे गोमंतकाचे भूषण. सह्याद्री वाहिनीसाठी मुलाखत देताना माईंनी प्रसन्न मनाने दिलेली उत्तरे आजही माझ्या स्मरणात आहेत. विठ्ठल कृष्णाजी कामत हे माईंचे श्‍वशुर. त्यांचा परमार्थातील अधिकार फारच मोठा. ‘नामजपाचे महत्त्व’ आणि ‘नामचिंतामणी’ हे त्यांचे दोन्ही ग्रंथ परमार्थ सोपान चढणार्‍या जीवाला आत्यंतिक मोलाचे आहेत. ‘नामचिंतामणी’सारखा ग्रंथ अन्य कोणत्याही भारतीय भाषेत झाला नाही, असे अनेक महानुभावांनी लेखी अभिप्राय देऊन मांडले आहे. कामतांचा परिचय ‘पारमार्थिक अण्णा’ असाच होता. माई संसारात पडण्यापूर्वी संगीत नाटकांतून कामे करायच्या, उत्तमपैकी गायच्या. माईंचे नाटकातील पद ऐकून अण्णा या बालिकेला म्हणाले होते, सुंदर आवाजाचा उपयोग कीर्तनात करशील तर लोकरंजनाबरोबरच देवरंजन होऊन परमेश्‍वर संतुष्ट होईल. तुझ्या सुस्वर आवाजाचा उपयोग हरिकीर्तनासाठी कर. तो प्रत्यक्ष भगवान तुझ्यापुढे उभा राहील आणि जगातील मिळवावयाची एकही वस्तू शिल्लक उरणार नाही.’’
झाले. माईंना अण्णांनी एका अर्थाने दीक्षाच दिली. पुढे अण्णांनी आपल्याच पुतण्याबरोबर, योगानंद विठ्ठल कामत यांच्याशी विवाह लावून दिला. माईंना परमार्थाचा खजिनाच सापडला. दुर्गादत्त मंदिरात होणारी हरिकीर्तने, विद्वत प्रवचने, सहस्त्रभोजने, पूजापाठ, हवन हे सारे नित्याचेच झाले. कर्‍हाडकरबुवा, निजामपुरकरबुवा, कान्हेरेबुवा सारे पट्टीचे कीर्तनकार माईंनी ऐकले. अण्णांचा आशीर्वाद फलद्रुप होण्याची प्रसादचिन्हे दिसू लागली. एके दिवशी मडगावच्या हरिमंदिरात माई कीर्तनासाठी उभ्या राहिल्या आणि हरिमंदिर डोलू लागले. माईंच्या कीर्तनाचा परिमळ गोव्याबाहेर पोहोचला. जेथे जेथे मराठी माणूस आहे, तेथे तेथे माईंना कीर्तनाची निमंत्रणे येऊ लागली. न्यायरत्न धुं. गो. विनोद, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. दत्तोपंत पटवर्धन, कीर्तनकेसरी कोल्हटकरबुवा अशी कीर्तनातील धुरंधर मंडळी माईंच्या कीर्तनाची वाखाणणी करू लागली. न्यायरत्न विनोदशास्त्रींनी पुणे मुक्कामी मोठा सत्कार करून ‘भक्ति विजया’ पदवी देऊन गौरविले.
ह. भ. प. नरहरबुवा कर्‍हाडकरांनी माईंच्या कीर्तनाचा गौरव करताना कीर्तनामध्ये पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोनच रंग कीर्तनकारांना आणि श्रोत्यांना माहीत आहेत. परंतु माईंच्या कीर्तनात ‘अपूर्वरंग’ असल्याचे जाहीरपणे सांगून त्यांच्या कीर्तनकलेचा गौरव केला आहे.
माईंनी हरिकथेचे बोट धरून कीर्तन दिग्विजय साजरा केला. कोठे आणि किती कीर्तने केली हा लेखाचा स्वतंत्र विषय ठरावा. माईंनी सलग दोन-दोन महिने एकाच ठिकाणी कीर्तने करून श्रोत्यांना भक्तिरसाच्या आनंदात बुडविले. अनेक विद्वानांना, मठाधीशांना, स्वामीमहाराजांना कीर्तनात डोलायला लावले. कोल्हापूर संस्थानचे मोठे कलाकार, बाबा गजबर यांच्या माडीवर झालेल्या कीर्तनानंतर गजबर माईंचे पाय पकडून ढसाढसा रडले.
अकलूजचे साखरसम्राट शंकरराव मोहिते पाटिलांनी सोलापूरला माईंचा फार मोठा सत्कार केला. भलामोठा मंडप, सजविलेले भव्य व्यासपीठ, संपूर्ण चौकात केलेली दिव्यांची रोषणाई, हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेला श्रोता. सारेच वर्णनापलिकडचे. आयुष्यातील अतीव आनंदाचा प्रसंग अशा शब्दात माई सोलापूर सत्काराच्या आठवणी सांगत.
माईंनी कीर्तनाचा नंदादीप लावला. अनेक मानसन्मान आणि उपाधी स्वसामर्थ्यावर संपादित केल्या. असंख्य मान्यवरांची मने जोडली. प्रचंड लोकप्रियता मिळविली. जनमानसात आदराचे स्थान मिळविले. माई! शेवटपर्यंत साध्याच राहिल्या. अहंकाराचा वारा त्यांना लागला नाही. विद्वत्तेची शेखी कधीच मिरवली नाही. भक्तिरस हाच सर्वश्रेष्ठ रस मानला. ‘शहाणे करोनि सोडावे, सकलजन’ ही उदात्त भावना अंतरंगात जपली. हरिकीर्तन हाच त्यांचा श्‍वास होता. अनेक स्वामीमहाराजांचे, मठाधीशांचे आणि साधुसंतांचे शुभाशिर्वाद माईंनी मिळविले. हीच त्यांची श्रीमंती होती.
संतरचनांना हिंदी चित्रपटातील गीतांच्या त्याचप्रमाणे मराठी भावगीतांच्या चाली लावून रचनेची लोकप्रियता वाढवली. माईंच्या या उपक्रमाचे स्वागत भाविकांनी मनोभावे केले. मोठमोठ्या शहरांतून माईंची कीर्तनसेवा चालू असता श्रोत्यांना माईंचे विलोभनीय दर्शन घडे. त्यावर अनेकांनी माई कीर्तनसेवेत कशा दिसल्या ते काव्यात लिहून ठेवले आहे, अशा असंख्य रचना उपलब्ध आहेत. त्यातील एक वानगीदाखल आर्या…

‘‘महिला भूषण महिला कीर्तन, वरदान देई राम हिला
राधा हे नाम हिला असता विकलाची जाई शाम हिला’’

१९२८ साली शिवोलीसारख्या एका खेड्यात जन्म घेतलेल्या माईंनी पाच तपापेक्षा अधिक काळ कीर्तनसेवा करून परशुराम भूमीचा आध्यात्मिक सुगंध भारताच्या अनेक प्रांतात परमळविला. माई! थोर तुझे उपकार… अशी भाषा श्रोत्यांच्या अंतःकरणातून आजही ऐकायला मिळते. ६३ वर्षे तेवत राहणारा हा कीर्तन नंदादीप मालवला.