किरण कांदोळकरांच्या भाजपवरील टिकेशी माझा काहीही संबंध नाही ः दिलीप परुळेकर

0
151

भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी भाजपवर जी टीका केलेली आहे त्या टीकेशी आपला काहीही संबंध नसल्याचे भाजप नेते व माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

पक्षावर टीका करताना किरण कांदोळकर यांनी आपले व माजी आमदार दामोदर (दामू) नाईक यांचेही नाव घेतले होते. भाजप एका विशिष्ट समाजातील नेत्यांना संपवू पाहत आहे व दिलीप परुळेकर व दामोदर नाईक यांना पक्षाने संपवले असल्याचे कांदोळकर यांनी म्हटले होते असे सांगून पक्षाने आपणाला संपवले असे आपणाला वाटत नाही व आपण किरण कांदोळकर यांनाही कधी तसे सांगितले नव्हते, असा खुलासा परुळेकर यांनी यावेळी केला. भाजपवर टीका करताना कांदोळकर यांनी आपले नाव घेतल्याने आपण हा खुलासा करीत असल्याचे परुळेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
आपण तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलो. एकदा मंत्रीही झालो असे सांगून पक्षाने आपणावर अन्याय केला असे आपणाला कधीही वाटले नसल्याचे ते म्हणाले.

कांदोळकर हे पक्षाच्या विरोधात काम करीत आहेत, असे तुम्हाला वाटते काय, असे विचारले असता कोलवाळ येथे त्यांनी आपल्या पत्नीला पक्षाच्या विरोधात रिंगणात उतरविले असून ते पत्नीसाठी प्रचार करीत असल्याचे परुळेकर म्हणाले.

जिल्हा पंचायतींत ४३ जागांपैकी १७ भंडारी
जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप ज्या ४३ जागा लढवत आहे त्यापैकी १७ जागांवर भाजपने भंडारी समाजाला उमेदवारी दिली असल्याचे परुळेकर म्हणाले. असे असताना कांदोळकर यांनी जे वक्तव्य केलेले आहे ते खेदजनक असल्याचे परुळेकर म्हणाले. एखादी संस्था अथवा एखादा पक्ष यांच्यापेक्षा व्यक्ती मोठी असू शकत नसल्याचे परुळेकर यावेळी पुढे बोलताना म्हणाले. आपण पक्षाकडेही आपली बाजू मांडली आहे व गैरसमज पसरू नये यासाठी पत्रकार परिषद घेऊनही खुलासा करीत असल्याचे ते त्यांनी नमूद केले.