किंग्स पंजाबकडून आरसीबीचा फडशा

0
97

>> यंदाच्या मोसमातील पहिले शतक केएल राहुलच्या नावे

किंग्स इलेव्हन पंजाबने यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग मोसमातील सर्वांत विशाल विजय नोंदवताना काल गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ९७ धावांनी पराभव केला. विजयासाठी २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगलोरचा डाव १०९ धावांत कोलमडला.

शेल्डन कॉटरेलने पडिकल व कोहली यांना बाद करत सुरुवातीलाच दिलेल्या धक्क्यांनी हादरलेला बंगलोरचा संघ शेवटपर्यंत सावरलाच नाही. मुरुगन अश्‍विन व रवी बिश्‍नोई या लेगस्पिन गोलंदाजांनी बंगलोरची मधली फळी कापून काढत संघाचा विशाल विजय साकार केला. दिल्ली कॅपिटल्सकडून सुपर ओव्हरमध्ये धक्कादायक पराभव झाल्यानंतर या विजयासह किंग्सने आपली गाडी रुळावर आणली आहे.

तत्पूर्वी, आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. त्याचा हा निर्णय अंगलट आला. लोकेश राहुलने बंगलोरच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करताना शतक लगावले. यंदाच्या आयपीएल मोसमातील हे पहिलेच शतक ठरले. त्याने केवळ ६९ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार व ७ षटकार लगावताना नाबाद १३२ धावांची खेळी केली.

लोकेश राहुल वैयक्तिक ८३ धावांवर खेळत असताना स्टेनने टाकलेल्या डावातील १७व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीने डीप मिडविकेटवर राहुलचा झेल सोडला. सैनीने टाकलेल्या १८व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कोहलीने पुन्हा एकदा राहुलला जीवदान दिले. यावेळी राहुल ८९ धावांवर होता. कोहलीकडून दुसरा झेल सुटल्यानंतर राहुल तुटून पडला. पुढील १४ चेंडूंत त्याने ४३ धावांची बरसात केली. पंजाबने डावातील १९व्या षटकात २६ व विसाव्या षटकात २३ धावा चोपल्या. पंजाबने शेवटच्या पाच षटकांत ८० धावा जमवल्या. यातील ६६ धावा एकट्या राहुलच्या होत्या. कोहलीने सोडलेल्या दोन झेलांमुळे पंजाबला द्विशतकी वेस ओलांडता आली.

किंग्स पंजाबने या सामन्यासाठी आपल्या संघात दोन बदल करत ख्रिस जॉर्डन व कृष्णप्पा गौतम यांना वगळून जिमी नीशम व मुरुगन अश्‍विन यांना संघात घेतले. दुसरीकडे बंगलोरने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळविलेला संघच कायम ठेवला.

धावफलक
किंग्स इलेव्हन पंजाब ः लोकेश राहुल नाबाद १३२ (६९ चेंडू, १४ चौकार, ७ षटकार), मयंक अगरवाल त्रि. गो. चहल २६, निकोलस पूरन झे. डीव्हिलियर्स गो. दुबे १७, ग्लेन मॅक्सवेल झे. फिंच गो. दुबे ५, करुण नायर नाबाद १५, अवांतर ११, एकूण २० षटकांत ३ बाद २०६

गोलंदाजी ः उमेश यादव ३-०-३५-०, डेल स्टेन ४-०-५७-०, नवदीप सैनी ४-०-३७-०, युजवेंद्र चहल ४-०-२५-१, वॉशिंग्टन सुंदर २-०-१३-०, शिवम दुबे ३-०-३३-२
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ः देवदत्त पडिकल झे. बिश्‍नोई गो. कॉटरेल १, ऍरोन फिंच त्रि. गो. बिश्‍नोई २०, जोश फिलिपे पायचीत गो. शमी ०, विराट कोहली झे. बिश्‍नोई गो. कॉटरेल १, एबी डीव्हिलियर्स झे. खान गो. अश्‍विन २८, वॉशिंग्टन सुंदर झे. अगरवाल गो. बिश्‍नोई ३०, शिवम दुबे त्रि. गो. मॅक्सवेल १२, उमेश यादव त्रि. गो. बिश्‍नोई ०, नवदीप सैनी त्रि. गो. अश्‍विन ६, डेल स्टेन नाबाद १, युजवेंद्र चहल पायचीत गो. अश्‍विन १, अवांतर ९, एकूण १७ षटकांत सर्वबाद १०९

गोलंदाजी ः शेल्डन कॉटरेल ३-०-१७-२, मोहम्मद शमी ३-०-१४-१, रवी बिश्‍नोई ४-०-३२-३, मुरुगन अश्‍विन ३-०-२१-३, जिमी नीशम २-०-१३-०, ग्लेन मॅक्सवेल २-०-१०-१

सर्वांत वेगवान ‘दोन हजारी’ भारतीय
राहुलने सामन्यात दोन धावा काढल्या आणि तो आयपीएलमध्ये सर्वात वेगवान २००० धावांचा टप्पा गाठणारा भारतीय फलंदाज ठरला. आयपीएलच्या ६० व्या डावात राहुलने हा विक्रम केला. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने ६३ डावात हा पराक्रम केला होता. आता राहुलने ६० डावांमध्ये २ हजार धावा करून सचिनला मागे टाकले आहे.