किंगफिशरच्या वाटेने

0
89

स्पाईसजेटही किंगफिशरच्या वाटेने चालल्याचे दिसू लागले आहे. तेल कंपन्यांचे देणे देण्यास स्पाईसजेट असमर्थ ठरल्याने त्यांनी विमानांना इंधन पुरवणेच तडकाफडकी बंद केले आणि दाबोळीसह ठिकठिकाणी हजारो प्रवासी अडकून पडले. किंगफिशर गाळात गेली तेव्हाही उड्डाणे रद्द होणे, सेवा पुरवठादारांनी एकेक करून सेवा बंद करणे, अभियंत्यांनी आणि कर्मचार्‍यांनी संप पुकारणे, पायलट नोकरी सोडून जाणे असे प्रकार घडले होते. मात्र, यावेळी सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने काही पावली उचलली आहेत. सरकारने सर्वांत प्रथम या तेल कंपन्यांना आणखी आठ दिवस तेलपुरवठा सुरू ठेवण्यास फर्मावले आहे. विमानतळांचे भाडे भरलेले नसूनही आणखी काही दिवस विमानोड्डाणांस परवानगी दिली आहे आणि कंपनीला कोठून तरी भांडवल मिळवता यावे यासाठी बाह्य व्यावसायिक कर्ज घेण्यास अर्थ मंत्रालयाने कंपनीला अनुमती दिलेली आहे. शिवाय कंपनीला ३१ मार्चपर्यंत तिकीट बुकींग करण्यासही परवानगी दिलेली आहे. अर्थात, सरकारने हा मदतीचा थोडाबहुत हात दिलेला असला, तरी त्यातून स्पाईसजेट सावरणार का हा मोठा प्रश्नच आहे. सरकारने स्पाईसजेटला केलेली ही मदत आवश्यक होती, कारण किंगफिशर पाठोपाठ स्पाईसजेटही दिवाळखोरीत जाणे हा भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा धक्का देणारे ठरेल. जवळजवळ सर्वच विमान कंपन्या जेरीस आलेल्या आहेत. त्यामुळे हवाई वाहतूक क्षेत्र सावरण्यासाठी सरकारला उपाययोजना करणे भाग आहे. स्पाईसजेट ही कंपनी कलानिधी मारन यांची. मारन मंडळींचा राजकीय प्रभाव संपुष्टात आलेला असल्याने विद्यमान पेचप्रसंगामधून त्यांच्या या कंपनीला सावरून धरणारा कोणी सध्या तरी दिसत नाही. आठ – पंधरा दिवसांच्या मुदतीत कंपनीला कोणी पाठीराखा मिळाला नाही तर मात्र कंपनीची परिस्थिती बिकट बनेल. स्पाईसजेट एकूण दोन हजार कोटींचे देणे आहे आणि सावरण्यासाठी आणि खेळते भांडवल हाती येण्यासाठी किमान एक हजार कोटींची गुंतवणूक तातडीने हवी आहे. बँकांकडून कलानिधी मारन यांच्या व्यक्तिगत हमीपोटी फार तर सहाशे कोटी येऊ शकतील, पण उर्वरित रकमेची जमवाजमव तातडीने करावी लागणार आहे. स्पाईसजेटच्या या पतनाचे संकेत गेल्या अनेक महिन्यांपासून मिळू लागले होते. विमानात खाद्यपदार्थ पुरवणार्‍या कंपनीने त्यांचा पुरवठा बंद केला आणि वैमानिक एकेक करून नोकरी सोडून जाऊ लागले तेव्हाच भावी अरिष्टाची चाहुल लागली होती. आताही कंपनी गाळात चालली आहे हे स्पष्ट झालेले असल्याने वैमानिक आणि कर्मचारी कंपनीला अखेरचा रामराम करण्याचीच शक्यता वाटते. तसे झाले तर कंपनीची स्थिती अधिक बिकट होईल. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना आणि वैमानिकांना गेल्या महिन्याचा पगार दिला गेलेला नाही. आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यास तयार राहा असे त्यांना कळवण्यात आलेले आहे. त्यामुळे या स्थितीत कर्मचारी टिकून राहणे अवघड आहे. सरकारने कंपनीला केवळ तीस दिवसांचे आगाऊ आरक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता कंपनीची स्थिती पाहून ३१ मार्चपर्यंतचे आरक्षण करण्याची परवानगी सरकारने दिलेली आहे. त्यामुळे निदान रद्द झालेल्या उड्डाणांचे पैसे प्रवाशांना परत करणे कंपनीला शक्य होऊ शकेल. पण स्पाईसजेट दिवाळखोरीकडे चालली आहे आणि दिवसागणिक उड्डाणे रद्द होत आहेत हे ठाऊक असूनही ग्राहक त्यांच्या विमानाचे आगाऊ आरक्षण करण्याचा मूर्खपणा करतील का हा प्रश्नच आहे. कंपनीची एक तृतियांश उड्डाणे बंद पडलेली आहेत. दिवसाला सत्तर उड्डाणे रद्द होत आहेत. त्यामुळे कंपनीच्या नावलौकीकास मोठा हादरा बसला आहे. २०१२ साली किंगफिशरच्या बाबतीत हेच घडले होते. आवश्यक भांडवल उभे करणे विजय मल्ल्यांना जमले नाही आणि बघता बघता देशातील अग्रगण्य विमान कंपनी डबघाईस आली आणि बुडाली. स्पाईसजेटही किंगफिशरएवढीच आज लोकप्रिय आहे. मात्र, विद्यमान पेचप्रसंगातून तोडगा काढता आला नाही तर तिचीही गत किंगफिशरप्रमाणेच होईल हे सांगण्यासाठी ज्योतिषाची आवश्यकता नसावी. पण तसे घडता कामा नये. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रावरच ही जी मळभट आलेली आहे ती दूर झाली नाही, तर मध्यमवर्गीयांचे हवाई प्रवासाचे स्वप्न कायमचे विरून जाईल.