काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सजाद अहमद या सरपंचांची त्यांच्या घरीच गोळ्या झाडून हत्या केली. अहमद हे भाजपशी संबंधित होते. काझीगुंड येथील आपल्या घराबाहेर ते असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना रुग्णालयात नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला. इतर सरपंचांसोबत अहमद हे सुरक्षित असलेल्या निर्वासित कॅम्पमध्ये राहत होते. काल सकाळी कॅम्प सोडून ते आपल्या घरी गेले होते. भाजपशी संबंधित नेत्यावर ४८ तासातील हा दुसरा हल्ला आहे. याआधी पंचायत सदस्य आरिफ अहमद खान यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.
मनोज सिन्हा उपराज्यपाल
जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी भाजप नेते आणि माजी मंत्री मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जी. सी. मूर्मू यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारल्यनंतर त्यांच्या जागी सिन्हा यांनी उपराज्यपालपदावर नेमणूक करण्यात आली आहे. श्री. मूर्मू यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मूर्मू यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात काश्मीर शांतता, स्थिरता आणि विकासाच्या मार्गावर पुढे गेल्याचे सांगण्यात येत आहे.