– सुशीला सगुण मातोणकर, ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक, मुळगाव
ती काळोखी रात्र आजही आठवली की अंगावर काटा उभा राहतो. काय झालं असतं तर? आम्ही१७ ऑक्टोबर २०१२ सालची गोष्ट. त्यावेळी मी दहावित होते. शाळेत शेवटचं वर्ष असल्याने दिवाळीच्या सुट्टीत पिकनिकला जायचं निश्चित झालं आणि आम्हा सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तसं पाहिलं तर मुलांना आपल्या मित्रांबरोबर बाहेर हिंडायला खूप मजा वाटते. पीकनिकला जायचं; पण कुठे? असा प्रश्न उभा ठाकला. शेवटी वाघेरी पर्वतावर जाण्याचं पक्कं झालं. वाघेरी पर्वत सत्तरी तालुक्यातील केरी गावालगत दिमाखात उभा आहे. वाघेरीच्या दर्शनाला अजून महीना बाकी होता. आम्हा सगळ्यांना मात्र कधी एकदाचा महीना सरतो आणि तो दिवस उजाडतो असं झालं होतं. शेवटी आम्ही वाट पाहत होतो तो दिवस एकदाचा उजाडला.
त्या दिवशी आम्ही खूप मजेत होतो. सकाळी साडेसातच्या दरम्यान आम्ही शाळेतून बाहेर पडलो. केरी – सत्तरी गाव निसर्गरम्य शांत वातावरणात सह्याद्रीच्या कुशित पहुडलं आहे. या गावातून चालत आम्ही अगदी थोड्याच वेळात वाघेरीच्या पायथ्याशी पोहोचलो. आम्हांला सहकार्य करण्यासाठी सोबत गाइड होता. त्याच्या मार्गदर्शनानुसार पर्वत चढायला सुरवात केली. रमतगमत पायवाट चालत होतो. चालून चालून सगळ्यांचे पाय खूप दुखायला लागले; पण आम्ही चालायचे थांबलो नाही. मजा करत चालत राहिलो. गाइड आम्हांला वाटेत भेटणारे पशुपक्षी, झाडे, कृमी-कीटक यांच्याविषयी माहिती देत होता.
शेवटी दुपारी एकच्या दरम्यान आम्ही उंच अशा पर्वताच्या टोकावर पोहोचलो. उंचावरून खालचा नजारा पाहायला खूपच सुंदर वाटत होता. झाडाझुडपांशिवाय माणसाचा चांगला मित्र कोणीच नाही असं म्हटलं जातं. त्याचा अनुभव आम्हांला आला. गडावरील निसर्गसौंदर्य न्याहाळत वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही. सूर्य परतीला निघाला आणि परतण्याची वेळ आली. जितक्या सोप्या तर्हेने आम्ही सगळ्यांनी पर्वत सर केला होता तितक्याच कठीण परिस्थितीत पर्वत उतरून खाली परतण्यास आम्हांला अथक परिश्रम करावे लागले. ज्या वाटेने आम्ही पर्वत चढलो होतो त्या वाटेने उतरलो तर खूप रात्र होईल म्हणून आम्ही एका शॉर्टकट वाटेने उतरायचे ठरविले. संध्याकाळचे ५.३० वाजले तरी आम्ही सगळेजण जंगलाच्या मधोमध होतो. आम्हांला कळलं की आमचे सर्व शिक्षक खूपच पाठीमागे राहिले होते. थोडा वेळ त्यांची वाट पाहत तेथेच थांबलो. मात्र, घड्याळाचा तासकाटा ६.३० च्या पुढे गेला तरी त्यांचा कुठे पत्ताच नव्हता. आम्ही खूप हाका मारल्या; पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी एकदाची त्यांची चाहुल लागली. आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. गाइडने माहिती दिली – गडावरून उतरण्यासाठी दोन वाटा आहेत. एक वाट देवराईतून जाते तर दुसरी सहसा कोणी वापरत नाहीत. पण, वापरात नसलेल्या वाटेने गेल्यास लवकर पोहचणार अशी माहिती त्याने दिली. सगळ्या मुलांना देवराईतून गेलेल्या वाटेने जायचे होते. पण खूप उशीर झाल्याने नवख्या वाटेचा मार्ग आम्ही निवडला.
चालता चालता सायंकाळ वाढत गेली आणि काय झालं कुणास ठाऊक पुढे वाटच दिसेनाशी झाली. चहुबाजूनी घनदाट झाडीच दिसत होती; पण तरीही आम्ही धीर एकवटून चालतच होतो. थोड्या वेळाने काळोख दाटून आला. सगळीकडे काळोख असल्याने आम्हांला काहीच दिसत नव्हते. आम्ही सगळे एकमेकांच्या हाताला हात धरून चालत होतो. तो गाइड अबोल बनला होता. त्याच्या चेहर्यावरून सहज समजत होतं की आम्ही वाट हरवलो आहोत. पण मनात आशा होती की आम्ही सुखरूप वेळेआधी नक्की खाली उतरणार. पण काही भलतच घडत होतं. कोणाला फोन करून मदतीला बोलावणार म्हटलं तर कुणाचजवळ मोबाइल नव्हता. गाइडकडे मोबाइल होता; पण बॅटरी डाउन असल्याने फायद्या झाला नाही. सोबत असलेल्या कॅमेर्याच्या उजेडावर आम्ही त्या अनोळखी जंगलात काळीज हातात घेऊन फिरत होतो. पण तो म्हणून किती वेळ साथ देणार? थोड्या वेळाने तोही बंद पडला. आता काही मुलांनी धीर सोडून रडायला सुरूवात केली होती. सगळीजण खूप घाबरली होती. काय करायचे कोणालाच समजत नव्हते. गाइड निर्धाराने सांगत होता – घाबरू नका, काहीएक होणार नाही. आम्ही लवकर गाव गाठू. पण थोड्या वेळानंतर त्याचीही सहनशक्ती संपली. चालून चालून आम्ही सगळी काजूच्या बागायतीत पोहोचलो आणि थोडा जीवात जीव आला. काजू बागायत म्हणजे गाव जवळ होता याची खात्री आम्हांला पटली होती.
मुले जंगलात हरवलीत ही बातमी वार्यासारखी गावात पसरली होती. शिक्षकांचा तर कुठे पत्ताच नव्हता. त्यांचे चार-पाच सहकारी विजेरी घेऊन आम्हांला शोधण्यासाठी आले. त्यांनी आम्हांला हाका मारून मारून शोधून काढले. त्यांच्याबरोबर राहिलेली वाट चालत आम्ही एकदाचेे गाव गाठले. वेळ न दवडता ही बातमी प्रत्येकाच्या घरी पोहोचली. आमच्या सवंगड्यांचे काही वडील मदतीला धावून आले होते. आम्ही सर्व सुखरूप असल्याचे पाहून त्यांच्या जीवात जीव आला. काही वेळाने आमचे शिक्षक राजेंद्र केरकरसरही पोहोचले. त्यांनी सगळ्यांना घरी नेले. पौर्णिमा टिचरने सगळ्यांना जेवायला वाढले. देवाच्या कृपेने आम्ही सर्व सुखरूप घरी पोहोचलो.
ती काळोखी रात्र आजही आठवली की अंगावर काटा उभा राहतो. काय झालं असतं तर? आम्ही सर्वजण एकत्र होतो म्हणून सुखरूप खाली येऊ शकलो. काही अनुचित घडलं असतं तर? आम्ही हरवलो असतो तर?? असे अनंत प्रश्न मनात येऊन भीती वाटते. ती काळरात्र आमचे सवंगडी जन्मभर विसरूच शकणार नाही.
……….