>> विश्वविजेतेपदासाठी कार्लसनशी झुंजणार
अमेरिकेचा ग्रँडमास्टर फाबियानो कारुआना याने काल संपलेली कँडिडेट्स स्पर्धा जिंकली आहे. या जेतेपदासह त्याने नॉर्वेचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याला आव्हान देण्याचा हक्क मिळविला आहे. नोव्हेंबर महिन्यात या दोघांमध्ये विश्वविजेतेपदासाठी लढत होणार आहे. बॉबी फिशर (१९७२) यांच्यानंतर विश्वविजेत्याला आव्हान देणारा कारुआना हा अमेरिकेचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
कारुआना याने कँडिडेट्स स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत रशियाच्या आलेक्झांडर ग्रिश्चुक याला नमवून १४ फेर्यांअंती आपली गुणसंख्या ९ केली. कारुआना याने अझरबैजानच्या शाखरियार मेमेदेयारोव व रशियाच्या सर्जेई कर्जाकिन यांना एका गुणाने मागे टाकले. कर्जाकिनने २०१६ साली कँडिडेट्स स्पर्धा जिंकली होती. परंतु, कार्लसनकडून त्याला टायब्रेकरवर पराजित व्हावे लागले होते. कँडिडेट मास्टर स्पर्धेत सहभागी आठही ग्रँडमास्टर्सनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळले.
क्रिउझबर्ग येथे झालेल्या या स्पर्धेत प्रत्येकी विजयासाठी एक व बरोबरीसाठी अर्धा गुण देण्यात आला. ९५,००० युरोंची कमाई केलेला कारुआना लंडनमध्ये ९ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होणार्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कार्लसनविरुद्ध झुंजणार आहे. कार्लसन या स्पर्धेत आपल्या विश्वविजेतेपदाचा तिसर्यांदा बचाव करण्यासाठी उतरणार आहे. २०१३ साली भारताच्या विश्वनाथन आनंदला तर २०१६ साली सर्जेई कर्जाकिनला नमवून कार्लसन अजिंक्य ठरला होता.
चौदाव्या फेरीचा निकाल ः आलेक्झांडर ग्रिश्चुक (रशिया, ६.५) पराभूत वि. फाबियानो कारुआना (अमेरिका, ९), व्लादिमीर क्रामनिक (रशिया, ६.५), बरोबरी वि. शाखरियार मेमेदेयारोव (अझरबैजान, ८), सर्जेई कर्जाकिन (रशिया, ८) बरोबरी वि. डिंग लिरेन (चीन, ७), लेवोन अरोनियन (अर्मेनिया, ४.५) बरोबरी वि. वेस्ली सो (अमेरिका, ६)