केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल गुरूवारी कर्नाटकातील कारवार येथील सी बर्ड प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी कारवारला जात असताना त्यांचे काल गरूवारी दुपारी दाबोेळी हंस तळावर आगमन झाले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हे कारवारमधील ‘सी बर्ड’ प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी जात असताना गोव्यात त्यांचे आगमन झाले. भारतीय वायुसेनेच्या विमानातून दुपारी १२:३० वाजता दाबोळी हंस तळावर त्यांचे श्रीपाद नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी गोवा ध्वजाधिकारी फिलोपीज पायनूमुटियल, नौदलप्रमुख ऍडमिरल करंमबिर सिंह उपस्थित होते.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नंतर १२:४० वाजता भारतीय वायूसेनेच्या खास हेलिकॉप्टरमधून कारवार येथे प्रयाण केले. दुपारी १ वाजून २० मिनिटांनी कारवार येथे प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर भोजन व विश्रांतीनंतर ‘सी बर्ड’ प्रकल्पाची पाहणी केली.
यावेळी त्यांनी तेथील साधनसुविधांविषयी माहिती जाणून घेऊन संध्याकाळी ५:३० वाजता त्यांनी तेथून प्रयाण केले. सहा वाजता त्यांचे दाबोळी हंस तळावर आगमन झाले. तेथून त्यांनी वायुसेनेच्या खास विमानाने कोची येथे जाण्यासाठी प्रयाण केले.