कायद्यानुसारच ‘त्या’ मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर

0
7

>> कर्नाटकातील मतदारांसाठी भरपगारी सुट्टीबाबत गोवा सरकारचे स्पष्टीकरण

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानादिवशी त्या राज्यातील गोव्यातील मतदार कामगारांना भरपगारी सुट्टी गोवा सरकारने जाहीर केल्यानंतर त्याला उद्योग जगतासह विरोधी पक्षांनी आक्षेप व विरोध दर्शवला होता. त्यावर काल गोवा सरकारने स्पष्टीकरण दिले. गोवा सरकारने लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 135 बी नुसार बुधवार दि. 10 मे 2023 रोजी कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान दिवस म्हणून कर्नाटक राज्यातील मतदारांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे, असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.
लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 135-बी नुसार कोणत्याही व्यावसायिक व्यापारी, औद्योगिक आस्थापनांमध्ये किंवा इतर कोणत्याही आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या आणि लोकसभेच्या किंवा राज्य विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक मतदाराला त्या दिवशी मतदानासाठी सुट्टी दिली जाते.

कर्नाटक हे शेजारील राज्य असल्याने गोव्यात मोठ्या प्रमाणात कर्नाटकातील मतदार आहेत आणि कर्नाटकच्या सीईओ कार्यालयाकडून मतदानाच्या दिवशी कर्नाटकचे मतदार असलेल्या कामगारांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्याची विनंती करण्यात आली होती आणि त्यामुळे त्याचा अनुकूल विचार करण्यात आला. नुकत्याच गोवा राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारनेही संबंधित राज्यामध्ये काम करणाऱ्या गोव्याच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी समान अधिसूचना जारी केली होती, असेही सरकारने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून सुट्टीचे समर्थन

पणजी (प्रतिनिधी) : कर्नाटकात 10 मे रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी गोवा सरकारने कर्नाटक राज्यात मतदार असलेल्या कामगारांना भरपगारी दिलेल्या सुट्टीचे समर्थन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केले. राज्य सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून ही भरपगारी सुट्टी दिलेली आहे. कर्नाटकातील कारवार व आसपासच्या भागात राहणारे नागरिक नोकरीसाठी दररोज गोव्यात ये-जा करतात. राज्यातील औद्योगिक संघटनेने कामगारांना भरपगारी सुट्टीबाबत आक्षेप घेणे अयोग्य आहे. गोवा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने कामगारांना भरपगारी सुट्टी दिली होती, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.