इम्रान यांच्या अटकेनंतर पाकमध्ये जाळपोळ

0
4

>> संतप्त समर्थकांचा अनेक शहरांत हैदोस; लाठ्याकाठ्यांसह उतरले रस्त्यावर; भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खान यांच्यावर कारवाई

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना काल अटक करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेच्या कारवाईनंतर इम्रान खान यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून, काल संतप्त समर्थकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडही केली. खान यांच्या समर्थकांनी पाक लष्कराच्या मुख्यालयावर हल्लाही केला. तसेच पेशावर येथील ‘रेडिओ पाकिस्तान’च्या इमारतीलाही आग लावली. मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी वाहनांना आग लावली, रस्त्यावर टायर जाळत वाहतूक रोखली व दगडफेकही केली. त्यामुळे पाकमधील अनेक शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या समर्थकांना आवरण्यासाठी पोलीस व सुरक्षा दलांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत त्यांना पांगवले.

इम्रान खान हे काल 2 प्रकरणात जामिनासाठी इस्लामाबाद न्यायालयात पोहोचले होते. इम्रान खान उच्च न्यायालयात दाखल होताच पाकिस्तानी रेंजर्स म्हणजेच निमलष्करी दल आणि सशस्त्र पथकेही उच्च न्यायालयात दाखल झाली, त्यानंतर निमलष्करी दलाने मंगळवारी इम्रान खान यांना न्यायालयाच्या बाहेर अटक केली.

‘अल कादिर ट्रस्ट’ प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. ही विद्यापीठाशी संबंधित केस आहे. इम्रान खान यांनी पंतप्रधान असताना या विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे दिली होती. या प्रकरणाचा खुलासा पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मलिक रियाझ यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे.

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे नेते मुसरत चीमा यांनी ट्विट करत अटक करणारे सुरक्षा अधिकारी खान यांना त्रास देत असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांना मारहाण केल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी या अटकेच्या कारवाई नाराजी व्यक्त केली. अटक करताना न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. न्यायालयात दाखल होण्याअगोदरच खान यांना अटक का करण्यात आली, असा सवाल न्यायालयाने केला.

परिस्थिती सामान्य; पोलिसांचा दावा
इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद पोलिसांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. अल कादिर ट्रस्ट केस प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याची माहिती इस्लामाबादच्या पोलिसांनी दिली. सध्या परिस्थिती सामान्य असून, कलम 144 लागू करण्यात आले आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे.

पाकमध्ये तणावाची परिस्थिती
इम्रान खान यांच्या अटकेनंतर संतप्त झालेल्या समर्थकांनी रस्त्यावर लाठ्या-काठ्यांसह जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अनेक ठिकाणी दगडफेक आणि वाहनांचीही जाळपोळ केली. लाहोरमध्ये आंदोलकांची पोलिसांशीही चकमक झाली. त्यानंतर त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर आणि पाण्याचे जोरदार फवारे मारून पांगवले. याशिवाय पेशावरमधील नॅशनल ब्रॉडकास्टर्स रेडिओ पाकिस्तानच्या इमारतीलाही त्यांनी आग लावली. त्या आगीत संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तसेच खैबर पख्तुन्वा येथील पाक लष्कराच्या मुख्यालयावरही आंदोलकांनी हल्ला केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला.