वास्को रेल्वेस्थानकावर कामावर रुजू असताना एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. वास्को रेल्वे पोलीस स्थानकावरील हवालदार संतोष हरिश्चंद्र घोगळे (47) हे शनिवार (दि. 17) रोजी रात्री उशिरा वास्को रेल्वे स्थानकांवर रुजू असताना अचानक खाली कोसळले. नंतर हवालदार संतोष घोगळे यांना त्वरित 108 रुग्णवाहिकेतून दाबोळी-चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले.
वास्को रेल्वे पोलिसांनी हवालदार घोगळे यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव जिल्हा रुग्णालयात पाठवला. रविवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन नंतर मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला. रविवारी दुपारी वास्को खारीवाडा हिंदू स्मशान भूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. हवालदार संतोष घोगळे बायणा येथे राहत होते.