कामापुरता मामा…

0
61
  • – ज. अ. रेडकर

कृतज्ञता हा एक संस्कार आहे. हा सद्गुण प्रत्येकापाशी असतोच असे नाही. कणभर उपकारांचे मणभर ओझे बाळगणारे जसे लोक असतात, तसे मणभर उपकार शुल्लक मानणारेही असतात… एकदा काम झाले की तुमच्याकडे ते पाठ फिरवतील.

‘कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी’ असे म्हटले जाते. या म्हणीचा वारंवार अनुभव माणसाला येत असतो. आपले काम होईपर्यंत माणसे गोड-गोड बोलतात आणि काम झाले की उपकारांची जाणीवदेखील ठेवत नाहीत. आमचे एक मित्र संपतराव यांना याचा अनुभव अनेकदा येतो आणि ते दुःखी होतात. मी त्यांना म्हटले, ‘‘अहो संपतराव, ही दुनियाच तशी आहे. आपण आपलं काम निरपेक्षपणं केलं तर कृतघ्नपणाची सल मनाला बोचणार नाही.’’ यावर त्यांचे म्हणणे, ‘‘हे सांगणे खूप सोपे आहे हो, परंतु प्रत्यक्षात आणणे खूप कठीण. कारण एखाद्याला मदत करण्यासाठी आपण आपला वेळ आणि स्वकष्टाचा पैसा खर्च केलेला असतो, त्याचा सल मनात राहणारच ना!’’ अर्थात संपतरावांचे म्हणणे काही खोटे नव्हते.

कृतज्ञता हा एक संस्कार आहे. हा सद्गुण प्रत्येकापाशी असतोच असे नाही. कणभर उपकारांचे मणभर ओझे बाळगणारे जसे लोक असतात, तसे मणभर उपकार शुल्लक मानणारेही असतात. आपले काम होईपर्यंत असे लोक तुमच्यापुढे गोंडा घोळतील, गोड-गोड बोलतील, तुमची खुशामत करतील… आणि एकदा काम झाले की तुमच्याकडे पाठ फिरवतील. काहीवेळा तर ओळखदेखील दाखवणार नाहीत. समजा अधिकारीपदावर असताना मदत केली तर त्रयस्ताकडे बोलले जाते, ‘मदत केली तर काय झाले, हाती सत्ता होती म्हणून मदत केली, नाहीतर कशी करणार होते?’ असा उद्दामपणा दाखवणारे लोकदेखील असतात. कुणाला आर्थिक मदत केली तरदेखील अशाच प्रकारचे उद्गार काढले जातात. याला ‘कृतघ्नता’ म्हणायचे नाही तर काय म्हणायचे?
संपतरावांना एका कार्यक्रमासाठी आग्रहाचे निमंत्रण मिळाले होते. ‘आपली प्रकृती ठीक नाही आणि आपण काही कारणास्तव परगावी आहोत म्हणून मी येऊ शकणार नाही’ असे सांगूनही कार्यक्रमाचे आयोजक ऐकेनात तेव्हा प्रकृती ठीक नसतानाही आयोजकांचा मान राखण्यासाठी ते सदर कार्यक्रमाला उपस्थित राहिले. कार्यक्रम संपला. आयोजक आपल्या गोतावळ्यातील लोकांच्या सरबराईत गुंतले. चहापान आणि नंतर फोटो सेशन सुरू झाले, पण संपतरावांकडे लक्ष द्यायचे कुणाला सुचलेच नाही. संपतराव मूकपणे हॉलच्या बाहेर पडले आणि घरी परतले. घरी आल्यावर त्यांना वाटले होते की निदान फोन करून तरी आयोजक आपली चौकशी करतील. दुर्लक्ष झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतील! पण कसचे काय आणि फाटक्यात पाय! ना फोन, ना दिलगिरी व्यक्त केली गेली, ना प्रकृतीविषयी चौकशी, ना कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. संपतरावांना वाईट वाटले. कारण, प्रकृती ठीक नसताना पदरमोड करून व दूरचा प्रवास करून ते या कार्यक्रमाला अगदी वेळेवर उपस्थित राहिले होते. समारंभ संपला आणि पाहुणे म्हणून बोलावलेल्या संपतरावांना आयोजक सपशेल विसरले. हा आयोजनातील गचाळपणा होता. आपण उगाच दगदग करून एवढ्या दूर समारंभाला गेलो याचा पश्चाताप संपतरावांना आता होत होता. असो.

वैशालीताई या गृह खात्याच्या अवर सचिव होत्या. या खात्याच्या सगळ्या महत्त्वाच्या फाईली त्यांच्या सहीशिवाय पुढे जात नसत. नोकरीत असेपर्यंत अनेक लोक आणि सरकारी खात्यातील अधिकारी त्यांची सरबराई करीत असत. येता-जाता सलाम ठोकीत असत. कालांतराने त्या निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर झालेल्या निरोप समारंभात त्यांच्या कामाचे सहकार्‍यांनी खूप कौतुक केले. त्यांचा कामाचा उरक, सहकार्‍यांशी असलेले संबंध, लोकांची निरपेक्ष बुद्धीने केलेली कामे याचे गुणवर्णन ऑफिसमधील लोकांनी केले. ‘मॅडम, आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही’ असे अभिवचन दिले गेले. खुद्द गृहखात्याचे मंत्री त्यांच्या निरोप समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहिले. वैशालीताईंना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. परंतु पुढे लोकांशी असलेला संपर्क तुटला. ऑफिसमधील कुणी भेटत नव्हते. सुरुवातीला काही लोकांचे फोन यायचे. खुशाली घेतली जायची. सल्ला मागितला जायचा. पुढे तेही बंद झाले.

काही महिन्यांनी आपल्या पेन्शनच्या काही कामासाठी त्या आपल्या पूर्वीच्या ऑफिसमध्ये गेल्या. त्यांचे पूर्वीचे काही सहकारी बदलून गेले होते, काही बढतीवर गेले होते. त्यांना ओळखणारे फारच थोडे तिथे उरले होते. परंतु सगळे आपापल्या कामात गर्क होते. वैशालीताईंकडे लक्ष द्यायला कुणाकडेही वेळ नव्हता. आपले काम होण्यासाठी त्यांना दोन तास तिष्ठत बसावे लागले. आपण खुर्चीत असताना असली कामे आपण किती चुटकीसरशी करीत असू याची आठवण त्यांना झाली आणि आज आपणाला तिथे त्याच कामासाठी दोन तास वाया घालवावे लागले. आपली कुणी दखलही घेतली नाही. दोन तास वाया गेले या दुःखापेक्षा आपणाला पूर्वीसारखे सन्मानाने वागवले गेले नाही याचेच त्यांना अधिक वाईट वाटत होते. कुणीतरी म्हटले आहे की, तुम्ही वीस दिवस नजरेआड झालात की तुम्हाला लोक विसरतात. वैशालीताईंना हाच अनुभव आला.
आपण अधिकारी म्हणून ज्या ऑफिसमधून निवृत्त झालेलो असतो तिथे कधीच पुन्हा जायचे नसते. कारण आपल्या खुर्चीत आपला त्यावेळचा कनिष्ठ बढती घेऊन बसलेला असतो. त्याच्या केबिनमध्ये प्रवेश करायचा तर बाहेर तिष्टत बसावे लागते. त्याच्या परवानगीने आत जावे लागते. प्रोटोकॉल सांभाळावा लागतो. केबिनमध्ये गेल्यावरदेखील त्याच्या समोरच्या खुर्चीत अभ्यागतासारखे बसावे लागते. त्याच्याशी अदबीने वागावे लागते आणि आपले काम करून देण्यासाठी त्याला विनंती करावी लागते. हा सगळा प्रकार एकप्रकारे अपमानास्पद असतो. आपला इगो दुखावतो. म्हणूनच आपण जिथून अधिकारी पदावरून निवृत्त झालेलो असू तिथे पुन्हा कधी जायचे नसते.

काही लोकांना सरकारच्या कृपेने सेवावाढ मिळते. पण अशा सेवावाढ घेतलेल्या अधिकार्‍याबद्दल अन्य कर्मचार्‍यांच्या मनात राग, असूया असू शकते. कारण कुणाच्या तरी बढतीच्या आड तो आलेला असतो. काही अधिकार्‍यांना कंत्राट पद्धतीने पुन्हा सेवेत घेतले जाते. कारण त्यांच्या क्षेत्रातील ते तज्ज्ञ असतात आणि त्यांच्या जागी तात्काळ योग्य माणूस नियुक्त करणे शक्य नसते. काही वेळा लेखा खात्यातील अनुभवी अधिकार्‍यांना नवीन वेतन श्रेणीच्या देय्य रकमेच्या कामासाठी कंत्राटी तत्त्वावर बोलावले जाते. यावेळी पूर्वीसारखा मान त्या व्यक्तीला त्याच्या या पूर्वीच्या कार्यालयात मिळत नाही, कारण तो आता कंत्राटी कामगार झालेला असतो. जो पूर्वी अधिकारी म्हणून आलिशान अशा थंडगार, स्वतंत्र, सुसज्ज केबिनमध्ये बसत असायचा, ज्याच्या हाताखाली आज्ञा झेलणारा अन्य कर्मचारीवर्ग असायचा, त्याला आता सर्वसाधारण कारकुनाच्या खोलीत बसून काम करावे लागते. अशावेळी अपमान गिळून काम करावे लागते. स्वाभिमानी लोक अशा कंत्राटी सेवा किंवा सरकारच्या कृपेने मिळणार्‍या सेवावाढ स्वीकारीत नाहीत.

एक माजी शिक्षण संचालक शिक्षक दिनाच्या दिवशी होणार्‍या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाला गेले. संचालकपदावर असताना ते अशा कार्यक्रमाचे प्रमुख अध्वर्यू असायचे. त्यांच्या आज्ञा सगळे पाळायचे. व्यासपीठावर शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री यांच्या सोबतीने बसायचा मान त्यांना मिळत असे. आज त्यांच्या जागी दुसरा होता. सभागृहात उपस्थित लोकांपैकी काहीजणांनी या माजी शिक्षण संचालकांची विचारपूस केली; मात्र कार्यक्रमाच्या आयोजकांनी त्यांची साधी दखलदेखील घेतली नाही. समारंभ संपल्यावर हिरमुसल्या चेहर्‍याने ते हॉलच्या बाहेर पडले. आमदार, खासदार, मंत्री आणि सरकारी अधिकारी यांना बहुतांशी असाच अनुभव येत असतो. ते जोपर्यंत सत्तेच्या खुर्चीत असतात तोपर्यंतच त्यांच्यापुढे कुर्निसात केला जातो. त्यांच्यापुढे गोंडा घोळला जातो. पण एकदा का ते सत्तेच्या चक्रातून बाहेर पडले की त्यांची किंमत शून्य! उगवत्या सूर्याला नमस्कार आणि मावळत्याकडे पाठ हा जगाचा दस्तूर आहे.
‘कामापुरता मामा आणि सत्ता तिथे बत्ता’ ही अशी जगरहाटी असते मित्रांनो!