राज्य सरकारच्या दक्षता विभागाने डिचोलीच्या उपनिबंधकांना सरकारी कामकाजात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून काल निलंबित केले.
डिचोली तालुक्यातील वेदांत या खाण कंपनीने नोंदणी शुल्काचा भरणा करून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही डिचोली उपनिबंधकांनी सदर फाईल काही दिवस प्रलंबित ठेवल्याचे समोर आले आहे. याबाबत कंपनीने सरकारी पातळीवर विचारणा केल्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. त्यानंतर डिचोली उपनिबंधकावर हलगर्जीचा ठपका ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कायदा खात्याकडून चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज्यातील उपनिबंधक कार्यालयात सामान्य नागरिकांना अनेकदा हेलपाटे घालावे लागतात. त्यांना आपले कामकाज पूर्ण करून घेण्यासाठी अनेक वेळा अधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागते. सरकारी कार्यालयात त्रास सहन करावा लागणाऱ्या नागरिकांना न्याय कधी मिळत नाहीत. तथापि, राज्य सरकारने एका बड्या खाण कंपनीची नोंदणी प्रक्रिया प्रलंबित ठेवली म्हणून उपनिबंधकावर निलंबनाची कारवाई केली आहे. राज्य सरकारच्या कारवाईचे स्वागत आहे. आता, राज्य सरकारने सामान्य लोकांना अशा प्रकारे त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना शोधून काढून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फरेरा यांनी पत्रकारांशी बोलताना काल केली.