मोप येथे कौशल्य विकास केंद्र
मोप येथे एक कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. या केंद्रात मोप आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकर्या मिळण्यासाठी जे कौशल्य लागणार आहे त्याचे तेथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
विविध उद्योग व कारखान्यात काम करण्याचे तास ८ वरुन १२ असे वाढवता यावेत यासाठी कामगार कायद्यात दुरुस्ती घडवून आणण्यास काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
कोरोना आपत्तीमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर विविध उद्योग व कारखान्यात दैनंदिन कामाचे तास ८ वरुन १२ असे वाढवले जावेत अशा सूचना अर्थतज्ज्ञ व अन्य काही घटकांकडून होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर काल गोवा मंत्रिमंडळाने या कायदा दुरुस्तीला मान्यता देण्याचा निर्णय घेतला.
हे कामाचे तास ८ वरुन १२ करण्यात येणार असले तरी वाढीव चार तासांसाठी कामगारांना ‘ओव्हर टाईम’ देण्यात येणार असल्याने त्यांना आर्थिक लाभ मिळू शकणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. कायद्यात दुरुस्ती झाल्यानंतर हा ४ तासांचा ओव्हर टाईम सक्तीचा होणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. हे कामाचे चार तास वाढवण्यात आल्यानंतर कामगारांना आणण्याची व परत नेऊन सोडण्याची जबाबदारी मालकांवर असेल व कायद्यात तशी तरतूद करण्यात येणार आहे.
लेखा खात्यात
३९ पदांची निर्मिती
लेखा खात्यात नव्या ३९ पदांची निर्मिती करण्याच्या प्रस्तावास काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही वेगवेगळ्या प्रकारची पदे असून ती भरण्यास सुमारे एका वर्षाचा अवधी लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. खात्यात लेखापालांची जी ४५ पदे आहेत त्या पदांचा आणि वरील वेगवेगळ्या पदांसाठीच्या ३९ पदांचा काहीही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गोमेकॉत दोन फिजिओथेरपीस्ट व दोन रेडिओ थेरपिस्ट पदांनाही मान्यता देण्यात आली.
दरम्यान, १७ मे नंतर राज्यात चहाची दुकाने, रेस्टॉरन्ट्स, मद्यालये व व्यायाम शाळा सुरू करू देण्यास मंत्रिमंडळात एकमत झाल्याचे मंत्रिमायकल लोबो यांनी सांगितले.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या कोविड-१९ साठीच्या वॉर्डात एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर तो रुग्ण कोरोनाचा होता अशी अफवा काही लोक पसरवू लागले असल्याचे काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले व लोकांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. गोमेकॉत अद्याप एकाही कोरोना रुग्णाचे निधन झाले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आम्हाला काहीही लपवायचे नाही असे सांगून कोरोनामुळे राज्यात जर कुणाचा मृत्यू झाला तर ते लपवण्यात येणार नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.