कामाचा ताण व सुटीच्या अभावामुळे पोलीसकर्मींचे आरोग्य ढासळतेय

0
122

पोलीस महासंचालक टी. एन्. मोहन
वाढता कामाचा ताण व साप्ताहिक सुटीचाही अभाव यामुळे गोव्यातील पोलीसकर्मींचे आयोग्य ढासळू लागले असल्याचे दिसून आले, असे पोलीस महासंचालक टी. एन्. मोहन यांनी काल काही पत्रकारांशी बोलताना सांगितले.ऑक्टोबरनंतर गोव्यात सुरू होणारा पर्यटन मोसम, नंतर येणारा चित्रपट महोत्सव, कार्निव्हल, शिगमोत्सव तसेच अन्य विविध छोटे मोठे महोत्सव, निवडणुका तसेच रोज येणार्‍या तक्रारी व न्यायालयातील खटले यामुळे पोलिसांना श्‍वास घ्यायलाही फुरसत मिळत नाही. ऑक्टोबर महिन्यानंतर तर बर्‍याच पोलिसांना साप्ताहिक सुटीही मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड मानसिक व शारीरिक ताण पडून त्यांच्या आरोग्यावर त्याचा ताण पडतो. सर्व पोलिसांना न चुकता साप्ताहिक सुटी ही मिळायलाच हवी या मताचा मी आहे. पण ऑक्टोबरनंतर बहुतेक जणांना ही साप्ताहिक सुटी मिळत नसल्याचे मोहन यांनी सांगितले. तसेच सर्व पोलिसांना वेळोवेळी त्यांची हक्काची रजा ही मिळायला हवी. शक्य असेल तेव्हा त्यांना ती दिली जाते. पण आणीबाणीच्या काळात ती देता येत नाही. आता आतंकवादी कारवायांचाही धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळेही पोलिसांना सतर्क रहावे लागते. या सगळ्याचा त्यांच्या फिटनेसवरही परिणाम झालेला आहे. खात्यातील १५ टक्के पोलीसकर्मी हे फिटनेसच्या कसोटीवर उतरत नाहीत. तर जे ५० वर्षांवरील पोलीसकर्मी आहेत त्यांच्यापैकी सुमारे २० टक्के पोलीसकर्मी हे खात्यात काम करण्याएवढे फिट नसल्याचे आढळून आले आहे, असे मोहन म्हणाले. या सर्वांना रोज व्यायाम करून महिनाभरानंतर फिटनेस टेस्टसाठी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे ते म्हणाले.