>> गणेशचतुर्थी दिवशीच घडली होती घटना; एकाने गमावले होते प्राण
माड-बाणसाय, कुडचडे येथे काही दिवसांपूर्वी नदीतून वाळू उपसा करणार्या तिघा कामगारांवर झालेल्या गोळीबारप्रकरणी कुडचडे पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. संशयिताचे नाव जोएल मोराईश (२९, रा. शेल्डे) असे असून, तो वाळू उपसा व्यावसायिकच आहे. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू, एक जखमी आणि एक जण सुदैवाने बचावला होता. या प्रकरणातील संशयिताच्या शोधात पोलीस होते; मात्र त्याचा शोध लागत नव्हता. अखेर १३ दिवसांनंतर या प्रकरणातील संशयितास अटक करण्यात कुडचडे पोलिसांना यश आले.
गणेशचतुर्थीच्या दिवशी रात्रीच्या वेळेस ही गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर या घटनेचे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. माड-बाणसाय येथे नदीच्या पात्रात तिघेजण होडीच्या साहाय्याने रेती उपसा करीत असताना त्यांच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला होता. त्यात युसूफ आणि महम्मद हे दोघे गंभीर जखमी झाले होते, तर होडीतील अन्य एकटा बचावला होता. त्याने होडी किनार्यावर आणून गंभीर अवस्थेतील दोघांना कुडचडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. त्या ठिकाणी युसूफ आलम (२३) या झारखंडमधील कामगाराचा मृत्यू झाला होता, तर महम्मद साहू (३३) या गंभीर जखमी अवस्थेतील कामगाराला पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल केले होते.
या प्रकरणी जोएल मोराईश याच्याविरुद्ध युसूफ आलम या कामगाराचा खून केल्याचा, तर एकाच्या महम्मद साहू याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणार्या दोघा व्यावसायिकांतील शत्रुत्वातून हा गोळीबार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर कुडचडे पोलिसांनी बेकायदा रेती उपसा करणार्यांविरोधात कारवाईची मोहीम उघडली होती. बेकायदा रेती उपसा प्रकरणी पाच जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला होता.