काबो राजभवनला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देणार

0
49

>> राज्यपालांकडून जाहीर; लवकरच जनतेसह पर्यटकांसाठी खुले होणार

दोनापावला येथील काबो राजभवन इमारतीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात येणार असून, या वास्तूचे जनतेला दर्शन घेता यावे, यासाठी नव्या राजभवन इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर ती जनतेसाठी खुली करण्यात येणार असल्याचे काल राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी जाहीर केले. एकदा ही वास्तू लोकांसाठी खुली करण्यात आली की, राज्यात येणार्‍या पर्यटकांनाही या वास्तूचे दर्शन घेता येणार असल्याचे त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

काल दोनापावला येथील काबो राजभवनजवळ बांधण्यात येणार असलेल्या नव्या राजभवन इमारतीची पायाभरणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाल्यानंतर दरबार हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते; मात्र भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी लवकरच निवडणूक होणार असल्याने त्यांनी यावेळी भाषण करणे टाळले.

काल सकाळी १० वाजता भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दोनापावला येथील काबो राजभवनजवळ नव्या राजभवनसाठीच्या वास्तूची कोनशिला बसवण्यात आली. तत्पूर्वी राज्यपालांच्या हस्ते नव्या राजभवन वास्तूसाठी भूमिपूजन झाले.
यावेळी बोलताना राज्यपालांनी गोव्याविषयी गौरवोद्गार काढले. गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चांगला वाव आहे; मात्र हे आध्यात्मिक पर्यटन हे एखाद्या विशिष्ट धर्मासाठी मर्यादित नसावे, असेही राज्यपाल ते म्हणाले. गोवा हे सुंदर व शांततापूर्ण राज्य असून, शहरांपेक्षा ग्रामीण भाग जास्त सुंदर असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमानंतर काल सायंकाळी राष्ट्रपती दिल्लीला रवाना झाले.

नव्या राजभवनसाठी राष्ट्रपतींची सूचना
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मागच्या वेळी गोव्यात आले होते, तेव्हा त्यांनी काबो राजभवनची इमारत ही खूप जुनी असल्याने या ठिकाणी सरकारने नवी राजभवन इमारत उभारावी, अशी सूचना केली होती. केंद्र सरकारच्या मदतीमुळे आता हे नवे राजभवन प्रत्यक्षात येणार आहे, असेही राज्यपाल म्हणाले. नवे राजभवन उभारण्यात येणार असले, तरी जुन्या राजभवन इमारतीचे जतन केले जाईल, असेही ते म्हणाले.

जीआय मानांकनासाठी कार्य
करणार्‍या व्यक्तींचा सन्मान

काजूची फेणी, खोला व हरमल येथील मिरची, मायंडोळी केळी, खाजे आदींना भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळावे यासाठी उल्लेखनीय असे काम केलेल्या काही व्यक्तींचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यात गुरुदत्त भक्ता (काजूची फेणी), रत्नाकर वेळीप (खोलाची मिरची), लवू ठाकूर (हरमलची मिरची), अशोक धावस्कर (मायंडोळी केळी) व राजाराम चणेकर (खाजे) यांचा समावेश होता. त्याशिवाय दीप परब व लेविन्सन मार्टिन्स या सरकारी अधिकार्‍यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.