काणकोण – मडगाव महामार्गाचे राष्ट्रीयीकरण करणार : मुख्यमंत्री

0
99

>> कदंबच्या हंगामी कर्मचार्‍यांना नियमित करणार

 

काणकोण ते मडगाव दरम्यानच्या महामार्गाचे प्रायोगिक तत्वावर राष्ट्रीयीकरण करण्याचे ठरविले आहे, असे असले तरी या मार्गावर वाहतूक सेवा देणार्‍या खाजगी बसगाड्यांच्या मालकांकडे, कर्मचार्‍यांकडे सरकार दुर्लक्ष करणार नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल कदंब महामंडळाच्या वर्धापनदिन सोहळ्यावेळी सांगितले. कदंब महामंडळाच्या हंगामी तत्वावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना सेवेत नियमित करणार असल्याचेही पार्सेकर यांनी यावेळी सांगितले.

कदंब महामंडळातील सर्व कर्मचारी हे या महामंडळाचे घटक असून त्यांनी कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच महामंडळाची काळजी घ्यावी, अतिरिक्त बसगाड्याही कदंबच्या ताब्यात रुजू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय कदंबमुळेच होऊ शकली. मार्गाच्या राष्ट्रीयीकरणामुळे कदंबला फायदा झाला आहे. काणकोण ते मडगाव मार्गाच्या राष्ट्रीयीकरणाच्यावेळी खाजगी बसगाड्या भाड्याने घेण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे खाजगी बस मालकांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले. कदंबच्या वेगवेगळ्या बस स्थानकांचा विकास सुरू आहे. बस स्थानकांचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांचा महसूल वाढविण्यासाठी फायदा होईल, असे वाहतूकमंत्री सुदीन ढवळीकर यांनी यावेळी सांगितले.

‘काणकोण-मडगाव महामार्ग राष्ट्रीयीकरणावेळी खासगी बसगाड्या भाड्याने घेण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे खासगी बस मालकांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही.’ – मुख्यमंत्री पार्सेकर