काणकोणात खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण

0
82

पैंगीण (न. प्र.)
काणकोण तालुक्यात या दिवसात वारंवार खंडित होण्यार्‍या वीज पुरवठ्यामुळे या भागातील नागरिक संतप्त बनले आहेत. त्याचा येथील पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला असल्याचे काणकोणच्या माजी नगराध्यक्ष सूचना गावकर यांचे म्हणणे आहे. गेले आठ दिवस नळाला एक तासही दिवसाला पाणी येत नसल्याचे त्यांनी सांगितले. सकाळच्यावेळी कामावर जाणारे कुटुंब सदस्य व मुलांना टिफीन बनविणार्‍या गृहिणींना या खंडित वीज पुरवठ्यामुळे बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागते. बहुतेक उपकरणे विजेवर चालत असल्याने दुपारचा व रात्रीचा स्वयंपाक बनविताना अडथळे येत आहेत. घरातील इतर कामेही आवरताना नाकी नऊ येत असल्याने वारंवारच्या या खंडित वीज पुरवठ्यामुळे येथील महिलावर्ग हैराण झाला आहे. दिवसाकाठी बराच वेळ वीजपुरवठा खंडित राहत असल्याने काणकोण औद्योगिक वसाहतीत असलेल्या कारखान्याच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. काणकोणात असलेल्या दुकानदारांनाही खंडित वीज पुरवठ्यामुळे आर्थिक नुकसानी सोसावी लागत आहे. गेल्या आठवड्यात परतीचा पाऊस पडत होता. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून वीजपुरवठा खंडित झाला होता. पण गेले चार – पाच दिवस पाऊस नाही, वारा नाही पण सकाळ संध्याकाळ खंडित वीजपुरवठा व रात्रीच्यावेळी गेलेली वीज तासनतास गायब होत असल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.