काणकोणात उभे राहणार अनोखे गाईंचे वसतिगृह

0
8

>> सभापती रमेश तवडकर यांच्या प्रयत्नांतून साकारणार

सभापती श्री. रमेश तवडकर हे श्रमधाम, लोकोत्सव यासारख्या कल्पक उपक्रमांद्वारे आपल्या मतदारसंघातील गोरगरीब आदिवासी जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सातत्याने करीत आले आहेत. आता त्यांच्या प्रयत्नांतून केंद्र सरकारची ‘गाईंचे वसतिगृह’ ही अनोखी संकल्पना काणकोण मतदारसंघात राबवली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या योजनेच्या मदतीने अमलात आणल्या जाणाऱ्या ह्या उपक्रमाखाली विविध मालकांच्या मालकीच्या गाई एकत्र एका निवाऱ्याखाली ठेवल्या जाणार असून त्यासाठीच्या सर्व साधनसुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मात्र, त्यांच्या दुधापासून मिळणारे उत्पन्न त्या गाईंच्या मालकांनाच दिले जाईल. गुरांसाठीचा चारा, त्यांची अन्य देखभाल, वैद्यकीय चिकित्सा ह्या सगळ्या गोष्टींची काळजी ह्या उपक्रमाखाली सरकारतर्फे घेतली जाईल. ह्या उपक्रमातून ग्रामीण दुग्धोत्पादनाला मोठी चालना मिळू शकेल आणि गोधनाचेही योग्य संवर्धन होईल अशी ह्यामागची कल्पना आहे.

ह्याच जोडीने स्थानिक गावठी भाजी उत्पादकांना पाठबळ देण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करण्याचीही योजना असून शेतकऱ्यांना त्यांच्या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी सर्व प्रकारचे साह्य करण्याचा सभापती श्री. तवडकर यांचा मानस आहे. ह्या दोन्ही उपक्रमांमधून ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी सक्षम होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.