- सौ. शिवांगी पैदरकर-बर्वे
- श्रीरंग व्यंकटेश जांभळे
वाढत्या तापमानामुळे अकाली फुले येणे, अनियमित फळे येणे आणि काढणीनंतरची गुणवत्ता कमी होते. याव्यतिरिक्त पावसाच्या बदलामुळे परागीकरण क्रियाकलाप आणि फलधारणा यावर परिणाम होतो. लहरी वातावरणाच्या कचाट्यात आंबा, काजूसोबतच कोकम, करवंदे, जांभूळ, सुपारी अशी विविध फळपिके अडकली आहेत. त्यामुळे या सर्वच फळपिकांच्या बाबतीत परिणाम जाणवत आहे.
गोवा हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेला एक लहानसा हिरवागार प्रदेश आहे. खाणकाम, पर्यटन आणि मासेमारीव्यतिरिक्त शेती हा प्रमुख व्यवसायांपैकी एक आहे; तो राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतो. अनुकूल हवामान आणि वैविध्यपूर्ण भूभागामुळे गोव्याला अनेक पिकांची व अनेक पद्धतीच्या शेतीची परंपरा आहे. सध्याच्या प्रतिकूलतेतही शेतीविषयक अनेक संधी उपलब्ध आहेत. गोव्यामध्ये शेतकरी काजू, नारळ, भात शेती, धान्य शेती, मसाला पिके, हर्बल आणि औषधी वनस्पती, फुलशेती, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला शेती, मत्स्यपालन, मधमाशी पालन, शेतमाल प्रक्रिया, कृषी पर्यटन आदी घटकांचा समावेश करून शेती करू शकतात. वरील व्यवसायांनी ग्रामीण, शहरी आणि किनारी लोकसंख्येला मुख्य उपजीविका पुरवली आहे.
फूड ॲण्ड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन- एफएओ (2018) नुसार गोव्यातील कृषीवर अवलंबून लोकसंख्येचा वाटा काम करणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत 32 % पेक्षा कमी आहे आणि तो ‘जीडीपी’च्या फक्त 16% आहे. गोव्यातील कृषी परिस्थितीची सांख्यिकीय आकडेवारी दर्शविते की पारंपरिक शेती क्षेत्र आणि कृषी उत्पादन कमी होत आहे. जरी शेती ही राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, जी बहुसंख्य गोव्यातील लोकांना उपजीविकेचे साधन प्रदान करते, परंतु आता भौतिक तसेच सांस्कृतिक घटकांमुळे ती वेगाने कमी होत आहे. आणि या सर्वात भर म्हणून हवामान बदलाचे विपरीत परिणाम शेतीवर दिसून येत आहेत.
काजू, आंबा आणि गोव्यातील हवामान
सध्या गोव्यामध्ये काजू, आंब्याचा हंगाम चालू झाला आहे. तसे पाहिल्यास आंब्याचे शास्त्रीय नाव ‘मँगीफेरा इंडिका’- म्हणजेच भारतीय अनुवांशिकता आहे. परंतु काजू- ‘ॲनाकार्डियम ऑक्सिडेंटल’- परदेशातून येथे आणला गेला आणि इथला झाला. गोव्यामध्ये 57000 हेक्टर जमिनीवर काजू पीक असून, 24000 टन एवढे उत्पादन घेतले जाते. तसेच 5000 हेक्टरवर 10000 टन याप्रमाणे आंब्याचे उत्पादन घेतले जाते. ही झाली सरकारी आकडेवारी.
काजू हे सूर्यप्रिय झाड आहे आणि जास्त सावली सहन करत नाही. ते कमी काळासाठी 36 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान सहन करू शकते. परंतु सर्वात अनुकूल तापमान 24 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस दरम्यान असते. काजू पिकाला येथील उष्ण व दमट हवामान फारच अनुकूल आहे. समुद्र सपाटीपासून 700 मी. उंचीच्या प्रदेशात आणि कमीत कमी 400 मि.मी. व जास्तीत जास्त 4000 मि.मी. पाऊस पडणाऱ्या भागात हे पीक चांगले येते. काजूची लागवड पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागात- जसे की किनारपट्टी, डोंगराळ प्रदेश आणि जास्त पाऊस आणि आर्द्रता असलेल्या भागात केली जाते. म्हणजेच गोव्यातील हवामान हे काजू पिकाला अगदी अनुकूल आहे.
आंबा हे एक प्रसिद्ध बागायती नगदी पीक आहे, जे त्याच्या चव, सुगंध आणि पौष्टिक फायद्यांसाठी जगभरात ओळखले जाते. पर्यावरणातील वाढत्या कार्बनचा विचार केल्यास काजू हे कार्बन साठवण्यासाठी आदर्श पीक आहे. काजू संशोधन संचालनालय (डीसीआर) येथे केलेल्या संशोधनावर आधारित, असे आढळून आले की सामान्य घनतेच्या लागवड प्रणालीच्या (156 झाडे/हेक्टर) तुलनेत उच्च-घनता लागवड प्रणाली (625 झाडे/हेक्टर) अंतर्गत 7 वर्षे जुन्या काजू झाडांनी सुमारे 2.2 पट जास्त कार्बन (सी) साठवला. उच्च-घनता लागवडीअंतर्गत वाढीच्या पाचव्या आणि सातव्या वर्षी काजूद्वारे कार्बन साठवण अनुक्रमे 32.25 आणि 59.22 टन सीओ2/हेक्टर एवढी झाल्याचे अभ्यासातून लक्षात आले.
गोव्यातील आंब्याच्या अनेक जाती या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आंब्याबद्दल बोलायचे झाले तर, जरी आंबा विविध प्रकारच्या हवामानात वाढू शकतो, तरी तो उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामानात सर्वोत्तम असतो. आंब्याला वाढीच्या काळात चांगला पाऊस आणि फुलांच्या कालावधीत थोडे कोरडे हवामान हवे असते. जून ते ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस गरजेचा असतो. अति उष्ण, अति दमट आणि अति पावसामुळे पिकावर परिणाम होतो.
फुलांच्या आणि फळधारणेच्या काळात अवकाळी आणि मुसळधार पाऊस हे काजू तसेच आंब्याच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम करणारे प्रमुख घटक आहेत. ढगाळ परिस्थिती, उच्च आर्द्रता आणि भरपूर दंव हे कीटक आणि रोगांच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल असतात. दुष्काळी परिस्थितीमुळे काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होते.
सध्याचे हवामान पाहता, पहाटे थंडी आणि धुके तर दुपारी उन्हाचा कडाका असे वातावरण आपल्या राज्यात दिसून येत आहे. या वातावरणाचा आंबा आणि काजू पिकांवर विपरीत परिणाम झालेला आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील तापमान 38-39 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. गेल्या वर्षी याच महिन्यात एका काजू बागायतदाराने एव्हाना आपल्या बागायतीतील 20 ते 30 क्विंटल काजू विकले होते; पण यंदा तोच शेतकरी हताश होऊन बसलेला दिसून येत आहे. सांगे, केपे, काणकोण, धारबांदोडा या भागातील शेतकरी- जो काजू हंगामावर पूर्णपणे आपले उर्वरित वर्ष घालवत होता- आज ‘या वर्सा काजू नाच’ हे म्हणताना दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत काजूचे उत्पादन लक्षणीय प्रमाणात कमी होत असल्याचे गोवा बागायतदार संस्थेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. या वर्षी काजू बीचे 20% च उत्पादन मिळणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे काजू उत्पादकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आंबा-काजूची झाडे मोहोराने पूर्णपणे बहरली. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात प्रचंड मोहोर आला. त्यामुळे उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या. पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहोराची फलधारणा झाली. यामुळे शेतकरी खूश दिसत होता. नजीकच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी किटकनाशक, बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या त्यांचा 30-40 टक्के मोहोर टिकला; परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात आलेला मोहोर मात्र पूर्णतः करपून गेला. 10 ते 15 दिवस सतत धुके पडले. याशिवाय फेब्रुवारी महिन्यात तापमान वाढीच्या झळा काजूच्या मोहोराला बसू लागल्या. 38-40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहिल्याने उन्हामुळे उरलासुरला मोहोर काळवंडून गेला. तसेच आंबा पिकामध्ये फळगळ वाढली.
बदलत्या हवामानामुळे फुलकिडे आणि फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो. अति उष्णतेमुळे आंबा कलमांना मोहोर येण्यास विलंब लागतो. तापमानातील चढ-उतार, पाऊस आणि हवामानातील आत्यंतिक घटना आंब्याच्या लागवडीवर परिणाम करतात, ज्यामुळे फुले येणे, फळे येणे आणि गुणवत्ता प्रभावित होते. हवामानामुळे होणारे बदल पारंपरिक फेनोलॉजिकल नमुन्यांमध्ये (फेनॉलॉजी म्हणजे चक्रीय आणि हंगामी नैसर्गिक घटनांचा अभ्यास- विशेषतः हवामान, वनस्पती आणि प्राणी जीवनाच्या संबंधात) व्यत्यय आणतात, ज्यामुळे परागीकरण, फळांचा विकास आणि उत्पादन यावर परिणाम होतो. वाढत्या तापमानामुळे अकाली फुले येणे, अनियमित फळे येणे आणि काढणीनंतरची गुणवत्ता कमी होते. याव्यतिरिक्त, पावसाच्या बदलामुळे परागीकरण क्रियाकलाप आणि फलधारणा यावर परिणाम होतो. लहरी वातावरणाच्या कचाट्यात आंबा, काजूसोबतच कोकम, करवंदे, जांभूळ, सुपारी अशी विविध फळपिके अडकली आहेत. हवामानात सतत होणारे बदल यामुळे यावर्षी कोकणपट्ट्यातील आंबा, काजू, कोकम, जांभूळ, सुपारी या सर्वच फळपिकांच्या बाबतीत परिणाम जाणवत आहेत.
काजू, आंबा आणि गोव्यातील बदलत्या हवामानावर उपाय
काजू हे आपल्या राज्यातील एक महत्त्वाचे निर्यात-केंद्रित बागायती पीक आहे. फळांच्या वाढीच्या टप्प्यात मल्चिंग, माती आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांचा अवलंब करून, जसे की ठिबक सिंचन/फर्टिगेशन करून हवामान बदलामुळे होणाऱ्या दुष्काळाचे परिणाम अंशतः कमी करता येतात. वाढत्या उष्णतेवर उपाय होऊन पंधरा दिवसातून एकदा असे 200 ते 300 लिटर पाणी काजूच्या झाडास द्यावे अशी शिफारस केली जाते. तापमानात वाढ झाल्यामुळे हिमनद्या वितळल्यामुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढदेखील काजू लागवडीसाठी समस्या निर्माण करू शकते. कारण भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात काजू लागवडीचा मोठा भाग आहे.
वैज्ञानिक साहित्याचा आधार घेत, आंब्याच्या वाढीवर, फळांच्या विकासावर आणि फेनोलॉजीवर हवामानातील परिवर्तनशीलतेचे परिणाम एकत्रित करणाऱ्या अभ्यासातून काही निष्कर्ष समोर आले. बदलत्या हवामान परिस्थितीत आंब्याच्या फेनोलॉजी समजून घेणे शाश्वत लागवडीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अभ्यास असे सूचित करतात की, आंब्याची झाडे प्लास्टिसिटी प्रदर्शित करतात, प्रतिकूल परिस्थितींविरुद्ध लवचिकता देतात. तरीही आंबा उत्पादनावर हवामानाचा परिणाम कमी करण्यासाठी अनुकूल धोरणे आवश्यक आहेत. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आंबा लागवडीची लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी भविष्यातील संशोधनात जाती-विशिष्ट प्रतिसाद आणि अनुकूलन उपायांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
तापमान प्रचंड वाढल्यामुळे फॉरेस्ट फायर किंवा आग लागण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. यामध्ये काजू बागायतीचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. या सर्वावर उपाय म्हणून गोवा सरकारची ‘शेतकरी आधार निधी’ ही योजना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. ‘शेतकरी आधार निधी’अंतर्गत गोवा सरकारच्या कृषी खात्यातर्फे नुकसान भरपाई दिली जाते. 1,60,000 रुपयेपर्यंत प्रति शेतकरी प्रतिवर्ष ही नुकसान भरपाई मिळते. तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला पूर, दुष्काळ, जोराचा वारा, दरी कोसळणे, साथीचा रोग व कीड लागवण, अवेळी पाऊस, अपघाती आग, वीज पडणे, भूकंप किंवा रानटी जनावरांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास ‘आधार निधी’ दिला जातो.
एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ सुरू केली. त्यापूर्वी सरकारने आधीच्या इन्शुरन्स स्कीम्स, जसे की- ‘राष्ट्रीय कृषी विमा योजना’, हवामानावर आधारित ‘पीक विमा योजना’ आणि सुधारित ‘राष्ट्रीय कृषी विमा योजना’ मागे घेतल्या. त्यामुळे सध्याच्या घडीला भारतामध्ये ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ ही प्रमुख योजना आहे. या योजनेअंतर्गत गोव्यामध्ये खरीफ हंगामामध्ये भात, कडधान्ये आणि ऊस या पिकांचा समावेश आहे, तर रब्बी हंगामामध्ये भात आणि कडधान्यांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गतसुद्धा दुष्काळ, पूर, अवेळी पावसामुळे झालेले नुकसान यावर भर दिलेला आहे. या योजनेमध्ये काजू, आंबा, सुपारी या पिकांचा समावेश करण्याची आता गरज आहे. हवामान बदलामुळे काजू, आंबा यांसारख्या पिकांचे नुकसान लक्षात घेता हवामानावर आधारित ‘पीक विमा योजना’ गोव्यात लागू करणे अत्यंत आवश्यक आहे. हल्लीच जाहीर झालेल्या राज्य कृषी धोरणात याचा उल्लेख केला आहे. यावर्षीपासूनच सरकारने ही योजना जाहीर करणे गरजेचे आहे. हवामानावर आधारित ‘पीक विमा योजना’ ही पाऊसमान, तापमान, दंव, आर्द्रता इत्यादींसारख्या हवामान घटकांच्या प्रतिकूल स्थितींमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीच्या परिणामी आर्थिक नुकसान होण्याच्या शक्यतेविरुद्ध विमाधारक शेतकऱ्यांचा त्रास दूर करते. याच उद्देशाने भारत सरकारने ही विमा योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ शेजारच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. गोव्यातील शेतकरी याच्या प्रतीक्षेत आहेत.
साधारण काढणीनंतरच्या प्रक्रियेदरम्यान आंब्याच्या गुणवत्तेवर तापमान आणि हवामानातील बदलांचा अजूनही परिणाम होत आहे. वाढलेले तापमान साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान फळांचा जलद ऱ्हास करते, ज्यामुळे कुजण्याचे प्रमाण वाढते आणि बाजारभाव कमी होतो. उलटपक्षी, शीतगृह तंत्रांचा वापर केल्याने शेल्फ लाइफ वाढू शकते; तथापि, जर तापमान ठरावीक मर्यादेपेक्षा कमी झाले तर थंडीमुळे दुखापत होऊ शकते. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनद्वारा अशी शीतगृहे बांधण्यासाठी अनुदान मिळते.
बदलत्या हवामानापासून सुरक्षितता म्हणून तयार झालेल्या फळांवर प्रक्रिया करणे फायदेशीर ठरू शकते. काजूपासून फेणी, ज्युस, केन्डी, कुकीज बनवू शकतो तर आंब्यापासून कच्च्या आंब्याचे लोणचे, पन्हे, आंबा पोळी, बर्फी, केक, जाम, जेली इत्यादी बनवता येते.
हवामानबदल आणि त्याचा परिणाम हा काही एक-दोन दिवसांत झालेला बदल नाही. आपली जीवनशैली तसेच शेती करण्याची पद्धत हेही घटक तितकेच जबाबदार आहेत. रासायनिक खतांचा, किटकनाशकांचा शेतीमध्ये प्रयोग, प्रत्येक ठिकाणी सोयीसाठी आपणच आपल्यासाठी बनवलेली प्लास्टिक आच्छादाने आणि इतर वस्तू, शेतातील तण व पिकांचे आवशेष जाळण्यासाठी घातलेली आग दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत ठरतेय. या सर्व विषयांबाबत शेतकरीवर्गाला जागृत करणे आवश्यक आहे. हवामान बदलाचे आंबा-काजूवरील परिणाम रोखण्यासाठी वरील उपाय तर केले पाहिजेतच; परंतु त्याचबरोबर जमिनीची धूप थांबवणे, जैविक शेती, योग्यवेळी आणि योग्य तेवढा पाण्याचा वापर यांसारख्या साध्या-सोप्या गोष्टी वैयक्तिक किंवा सामाजिक पातळीवर करण्याची आवश्यकता आहे.