पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये गेेलेल्या दहा आमदारांना पुन्हा पक्षात प्रवेश देऊ नये असा ठराव प्रदेश कॉंग्रेस समितीने केला आहे आणि तो आता पक्षाच्या केंद्रीय कार्यसमितीकडे पाठवला जाणार आहे. अशा प्रकारचा ठराव घेण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. २०१४ साली लोकसभेची उमेदवारी आपल्या कन्येला मिळावी म्हणून चर्चिल आलेमाव यांनी बंडखोरीचे पाऊल उचलले होते तेव्हाही कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील प्रदेश कॉंग्रेस समितीने पक्ष सोडून जाणार्यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाऊ नये असा ठराव घेतला होता. परंतु जेव्हा जेव्हा निवडणूक येते, तेव्हा पक्ष सोडून गेलेल्यालाच काय, निवडणूक जिंकण्याची शक्यता असेल तर कोणत्याही सोम्यागोम्याला पक्षामध्ये घेऊन उमेदवारी देण्यास कॉंग्रेस पक्ष मागेपुढे पाहणार नाही. बाबूश मोन्सेर्रात यांना कॉंग्रेसची पणजीची उमेदवारी गेल्या पोटनिवडणुकीत कशी दिली गेली हे उदाहरण समोर आहेच. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्या दहाजणांना पुन्हा प्रवेश देऊ नये हे ठरावापुरते ठीक आहे, परंतु उद्या निवडणुकीच्या वेळेस ही मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये ‘घुसमट’ होऊन जर पुन्हा कॉंग्रेसकडे आली, तर त्यांच्यासाठी दारे सताड उघडी करून पायघड्या अंथरल्या जातील हे सांगण्यास भविष्यवेत्त्याची गरज नाही. कॉंग्रेस पक्षाला आज राष्ट्रीय स्तरावर जी गळती लागलेली आहे, ती पाहिली, तर पक्षापासून दूर गेलेल्यांना पुन्हा प्रवेश न देण्याचे ठराव कार्यवाहीत आणणे कठीण आहे. शेवटी आजकालच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची ठरत असते ती निवडून येण्याची क्षमता. पक्षनिष्ठा, विचारधारा वगैरे गोष्टींशी आज ना कॉंग्रेसचे काही देणेघेणे राहिले आहे, ना भारतीय जनता पक्षाचे. ज्या प्रकारे भाजपाने सध्या केवळ ‘विनेबिलिटी’ म्हणजे निवडून येण्याची क्षमता विचारात घेऊन एकगठ्ठा आयात चालवलेली आहे, ती पाहिली तर देश कॉंग्रेसमुक्त होता होता भाजपाच आज कॉंग्रेसयुक्त होत चाललेला आहे. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये असंतोष खदखदत असला तरी त्याचे कोणाला देणेघेणे नाही. केवळ आकड्यांच्या बेरजेच्या राजकारणामध्ये निष्ठा, विचारधारा, समर्पण या गोष्टी गैरलागू ठरत आहेत. कॉंग्रेसची तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा त्याग केल्यापासून निर्नायकी स्थितीत तो पक्ष बराच काळ राहिला. शेवटी सोनिया गांधी यांच्याकडे अंतरिम अध्यक्षपद सोपविण्यात आले, परंतु पूर्णकालीक अध्यक्षासाठी गांधी घराण्यापलीकडे जाण्याचा विचारही पक्ष आज करू शकत नाही अशी स्थिती आहे. राहुल अनुत्सुक आहेत, सोनिया आजारी आहेत अशा वेळी प्रियांका गांधी यांचे नाव पुढे आणले जात आहे. म्हणजेच शेवटी कॉंग्रेसला एकसंध ठेवण्यासाठी कोणी तरी ‘गांधी’ हवा आहे. घराणेशाहीवरील टीका टाळण्यासाठी उत्तर प्रदेशमधील छोटीशी जबाबदारी स्वीकारून प्रियांका पक्षाच्या राजकारणात उतरल्या आहेत, परंतु अद्याप तरी त्यांच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. शिवाय त्यांच्यावर पती रॉबर्ट वड्राच्या कथित जमीन घोटाळ्यांची टांगती तलवार आहे ती वेगळीच. एकदा का प्रियांका कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी जरा जोमाने पुढे सरसावल्या की सीबीआय आणि ईडीचा विळखा रॉबर्ट वड्राला पडल्याखेरीज राहणार नाही. गेल्या वेळी प्रियांका पक्षाच्या राजकारणात उतरत असल्याचे स्पष्ट होताच रॉबर्ट वड्राभोवती पाश कसले गेले होते. या परिस्थितीत कॉंग्रेस पक्ष जेथे राष्ट्रीय स्तरावरच निर्नायकी स्थितीमध्ये गटांगळ्या खातो आहे, तिथे राज्याराज्यांमध्ये त्याचे तारू कोण सांभाळून ठेवणार आहे? बुडत्या जहाजातून उंदीर पलीकडे उड्या मारून जाणे मग ओघाने आलेच. गोव्यामध्ये तर हेच झाले. दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सतरापैकी एक, दोन आणि नंतर एकगठ्ठा दहा असे करीत आजवर तेरा आमदार पक्ष सोडून गेले आहेत. खरे तर एखादे नेतृत्व जेव्हा पक्ष सोडून जाते तेव्हा त्याला पर्याय उभा करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असते. परंतु अनेकदा तसे होत नाही. आयते उमेदवार मिळवून निभावून नेण्याकडेच राजकीय पक्षांचा कल असतो. निष्ठावानांना न्याय देण्याऐवजी त्यांनी आमच्या माणसाला नेले म्हणून आम्ही त्यांच्या पक्षातील असंतुष्टाला आमच्यात घेणार हे जे काही सोईचे राजकारण चालते, त्यातून नवे नेतृत्व निर्माण होत नाही आणि कार्यकर्ते दुखावले जातात. भाजपमध्ये जरा बेदिली माजण्याचा अवकाश, आज त्यांना माघारी प्रवेश देऊ नये असा ठराव करणारी मंडळीच त्यांना कॉंग्रेसमध्ये पुन्हा आणण्यासाठी जंग जंग पछाडतील. शेवटी हे राजकारण आहे आणि तेथे आयाराम – गयाराम संस्कृती ही सामान्य गोष्ट आज बनलेली आहे. जे दहाजण भाजपात गेेलेले आहेत, ते तेथे कितपत टिकतील हा प्रश्नच आहे. वरकरणी सारे पक्षाशी समरस झालेले जरी दिसत असले, तरी प्रत्यक्षात जो तो केवळ स्वार्थापोटी तेथे स्थिरस्थावर झालेला आहे. एकदा का त्यामध्ये भाजपा श्रेष्ठींनी खोडा घातला की पुन्हा माघारी येण्याचे वारे वाहू लागेल. त्यामुळे तशी परिस्थिती आली तर खरोखरच कॉंग्रेस आपल्या ठरावावर ठाम राहू शकणार आहे का?