आमदार बाबूश मोन्सेर्रात यांनी काल पणजीचे महापौर उदय मडकईकर तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते व संबंधित नगरसेवक यांच्यासह मिरामार ते कांपाल या दरम्यानच्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुढील पावसाळ्यात मिरामार ते कांपाल या दरम्यान पुरामुळे रस्ता पाण्याखाली जाऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची अभियंत्यांना सूचना केली. यावेळी अभियंत्यांनी मोन्सेर्रात यांना पुराच्या पाण्यासाठी गटाराची चोख व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना मोन्सेर्रात म्हणाले की, मिरामार ते कांपाल हा रस्ता पुढील पावसाळ्यात पाण्याखाली जाऊ नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेश आपण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना दिले आहेत. त्यासाठी या रस्त्यावर असलेल्या गटार व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचे आदेश आपण दिले असल्याचे ते म्हणाले.
महापौर उदय मडकईकर म्हणाले की या पाहणीच्या वेळी रस्ता, गटारे, पुराचे पाणी आदी विविध प्रश्नांवर चर्चा करून उपाययोजना करण्याचे ठरले.