>> नायजेरियनास अटक, कळंगुट पोलिसांची कारवाई
कळंगुट पोलिसांनी काल मंगळवार दि. २९ रोजी एका छाप्यात मोठी कारवाई करत सुमारे ३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी एका नायजेरियनास ताब्यात घेतले आहे. कळंगुटचे पोलीस निरीक्षक नोलास्को रापोज यांनी पोलीस सहकार्यांच्या मदतीने हा छापा टाकला.
उत्तर गोव्याचे अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांनी काल पर्वरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आतापर्यंतच्या अमली पदार्थ छाप्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे असे ते म्हणाले. कांदोळी येथील शिमेरमधील एका खोलीत इफ्यानवी पास्कोल ओबी ऊर्फ आलेक्स (३४) या नायजेरियन इसमाकडून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यात १.०२१ किलो कोकेन, २.०३५ किलो एमडीएम, ७६० ग्रॅम अँफेटामाईन, १०६ गॅम चरस, १.२७० किलो गांजा यांचा समावेश असून त्याच्याकडून दोन लाखांची रोकडही पोलिसांनी जप्त केली.
निरीक्षक रापोज यांनी याबाबत सांगितले की, या प्रकरणातील आरोपी २०११ साली व्हिसा संपल्यानंतर वास्तव्यास असल्याबद्दल तसेच २०१२ साली अमली पदार्थांसह त्याला अटक करण्यात आली होती. पोलिसांची आरोपीवर नजर होती आणि मंगळवारी पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. या मोहिमेत निरीक्षक रापोज यांच्यासह उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, महिला उपनिरीक्षक प्रगती मळीक, हवालदार विनय श्रीवास्तव, शशांक साखळकर, महाबळेश्वर सावंत, सुरेश नाईक, स्मितल बांदेकर, संज्योत केरकर, गोविंद पटनाईक, राजेश पार्सेकर, मनोज नाईक, महेंद्र च्यारी, बाबुसो साळगावकर, योगेश खोलकर, लक्ष्मण मांद्रेकर, दिनेश मोरजकर आणि शैलेश गडेकर यांचा सहभाग होता.
पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध अमली पदार्थ कारवाई कायद्याखाली गुन्हा नोंदविला असून एसडीपीओ एडविन कुलासो आणि अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.