कांदा खरेदीसाठी फलोत्पादनला १५ कोटी

0
135

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा फलोत्पादन महामंडळाला कांदा खरेदीसाठी १५ कोटी रुपये काल मंजूर केले. सरकारने मंजूर केलेला पंधरा कोटींचा निधी महामंडळाला प्राप्त झाल्यानंतर कांद्यांची खरेदी करून कमी दरात कांद्यांची विक्री केली जाणार आहे. महामंडळाने नवीन पुरवठादारांकडून कांदा खरेदीसाठीचा प्रयत्न थांबविला आहे. जुन्याच पुरवठादारांकडून कांद्याची खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रवीण झांट्ये यांनी काल दिली.
फलोत्पादन महामंडळाला भाजी पुरवठा करणार्‍या पुरवठादारांची सुमारे ३५ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. त्यामुळे पुरवठादारांनी कांद्याचा पुरवठा करणे बंद केले आहे. महामंडळाचे अध्यक्ष झांट्ये यांनी कांद्यांचा पुरवठा करणार्‍या पुरवठादारांशी गुरूवारी पुन्हा एकदा चर्चा करून थकबाकी देण्यात आल्यानंतर कांद्याचा पुरवठा करण्याची विनंती केली. त्यानंतर, मंडळाचे अध्यक्ष झांट्ये यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन महामंडळाचे थकीत असलेले ३४ कोटी रुपयांचे अनुदान वितरित विनंती केली. यापूर्वी, मंडळाचे अध्यक्ष झांट्ये यांनी मुख्यमंत्र्यांकडे थकबाकीमुळे निर्माण झालेल्या समस्येचा विषय मांडला होता.