कांगारूंसमोर ३०३ धावांचे लक्ष्य

0
101

जॉनी बॅअरस्टोवने लगावलेले आपले दहावे एकदिवसीय शतक तसेच सॅम बिलिंग्स व ख्रिस वोक्स यांच्या अर्धशतकांच्या बळावर यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या व निर्णायक वनडे सामन्यात निर्धारित ५० षटकांत ७ बाद ३०२ धावा उभारत कांगारूंसमोर मालिका व सामना जिंकण्यासाठी ३०३ धावांचे लक्ष्य ठेवले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर इंग्लंडची सुरुवात भयावह झाली. डावातील पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने जेसन रॉय याला ग्लेन मॅक्सवेलकरवी झेलबाद केले. स्टार्कने एका अप्रतिम इनस्विंगरवर माजी कर्णधार ज्यो रुट याला पायचीतच्या सापळ्यात पकडत इंग्लंडची २ चेंडूंनंतर २ बाद ० अशी स्थिती केली. या स्थितीतून कर्णधार मॉर्गन व बॅअरस्टोव यांनी संघाचा डाव सावरत तिसर्‍या गड्यासाठी ६७ धावांची भागीदारी रचली. लेगस्पिनर झॅम्पाने मॉर्गनला तंबूत पाठवत ही जोडी फोडली.

यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर (८) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्याने इंग्लंडचा संघ ४ बाद ९६ अशा संकटात सापडला. संघ अडचणीत असताना सॅम बिलिंग्स मदतीला धावला. त्याने आपले चौथे वनडे अर्धशतक ठोकत बॅअरस्टोवसह पाचव्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी रचली. या दरम्यान बॅअरस्टोव यानेदेखील आपले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या शतकी खेळीत १२ चौकार व २ षटकार ठोकले. ४१व्या षटकात बॅअरस्टोव परतला तेव्हा फलकावर केवळ २२० धावा लागल्या होत्या. ख्रिस वोक्सने यानंतर फटकेबाजी करत ३९ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. टॉम करनने १९ व आदिल रशीदने नाबाद ११ धावा करत त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून झॅम्पा व स्टार्क यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.

धावफलक
इंग्लंड ः जेसन रॉय झे. मॅक्सवेल गो. स्टार्क ०, जॉनी बॅअरस्टोव त्रि. गो. कमिन्स ११२, ज्यो रुट पायचीत गो. स्टार्क ०, ऑईन मॉर्गन झे. स्टार्क गो. झॅम्पा २३, जोस बटलर झे. फिंच गो. झॅम्पा ८, सॅम बिलिंग्स झे. मार्श गो. झॅम्पा ५७, ख्रिस वोक्स नाबाद ५३, टॉम करन त्रि. गो. स्टार्क १९, आदिल रशीद नाबाद ११, अवांतर १९, एकूण ५० षटकांत ७ बाद ३०२
गोलंदाजी ः मिचेल स्टार्क १०-०-७४-३, जोश हेझलवूड १०-०-६८-०, पॅट कमिन्स १०-०-५३-१, ऍडम झॅम्पा १०-०-५१-३, मिचेल मार्श ६-०-२५-०, ग्लेन मॅक्सवेल ४-०-२३-०