>> म्हादई रक्षणासह खाण व्यवसाय सुरू करण्याची ग्वाही
>> गोवा राज्यासाठी 21 आश्वासने
गोव्याचा निसर्ग, गोव्याची संस्कृती व अस्मिता सगळेच नष्ट करण्याचे सत्र सत्ताधारी भाजपने सुरू केलेले आहे. परिणामी गोव्याबरोबरच ‘गोंयकारपण’ही धोक्यात आलेले असून गोवा व गोमंतकीयांना वाचवण्यासाठीचा जाहीरनामा आम्ही तयार केलेला आहे. हा जाहीरनामा म्हणजे काँग्रेस पक्षाची गॅरंटी आहे. गोवा वाचवण्यासाठीची ही गॅरंटी असून ती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यातील जनतेला देत आहोत असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने गोवा राज्यासाठीचा आपला निवडणूक जाहीरनामा काल काँग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत जाहीर केला. या जाहीरनाम्यातून काँग्रेस पक्षाने राज्यातील जनतेला 21 आश्वासने दिली असून त्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास म्हादई नदीच्या रक्षणासह गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्याच्या आश्वासनासह राज्यातील अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण मिळवून देण्याच्या आश्वासनाचाही समावेश आहे.
याप्रसंगी पत्रकार परिषदेत बोलताना गावा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी, काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रचारासाठी गेले असता गोव्यातील जनतेने त्यांच्यापुढे मांडलेल्या समस्या व प्रश्न लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार केलेला आहे. 2012 साली गोव्यात तर 2014 साली केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून गोव्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गोव्याचे वनक्षेत्र म्हणजेच वसुंधरा, वन्यजीव व वृक्षवल्ली व पर्यायाने गोव्याचे पर्यावरण याचे रक्षण करणे आम्ही आमची सर्वांत पहिली जबाबदारी समजत आहोत. गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे. त्यामुळे हिरव्या व निसर्गाने समृद्ध असलेल्या गोव्याचे जतन करणे ही आम्ही आमची पहिली जबाबदारी म्हणून हातात घेणार आहोत. भाजपने तथाकथित विकासाच्या नावाखाली गोवा हे कोळशासाठीचे एक केंद्र बनवण्यासाठी राज्यात तीन महाप्रकल्प आणण्याची योजना आखलेली असून या योजनांमुळे गोव्याचा निसर्ग नष्ट होणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कोळसा प्रदूषण वाढणार आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व तमनार प्रकल्प व राष्ट्रीय महामार्ग हे तिन्ही प्रकल्प काँग्रेस सत्तेवर आल्यास रद्द करणार असल्याचे पाटकर म्हणाले.
केंद्र सरकारवर जोरदार टीका
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना अमित पाटकर तसेच युरी आलेमांव यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
पाटकर यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ खोटी आश्वासने देऊन जनतेला फसवत आहोत. 2014 साली सत्तेवर आल्यापासून ते गोव्यातील सत्तेवर आल्यापासून ते गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याचे केवळ आश्वासन देत आहेत. मात्र, त्यांना खाण उद्योग सुरू करण्यास पूर्ण अपयश आल्याचे सांगितले.
गोव्याचा लिलाव ः युरी
यावेळी बोलताना युरी आलेमांव यांनी, गोवा राज्याचे अस्तित्व भाजप सरकारने धोक्यात आणले आहे. आमचे वनक्षेत्र, आमच्या नद्या, आमचे पर्यावरण, आमचा नैसर्गिक वारसा या सगळ्यांचाच भाजप सरकारने लिलाव चालवला आहे. याविरुद्ध संसदेत आवाज उठवण्यची गरज असून त्यासाठी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर गोव्यातील जनतेचे सेवक या नात्याने संसदेत गोव्याची बाजू मांडणार असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यानंतर संसदेत गोव्यातील कोळसा प्रदूषण, दुहेरी नागरिकत्व, राज्यातील बेरोजगारी अशा विविध प्रश्नांवर आवाज उठविणार असल्याचे आलेमांव म्हणाले. काँग्रेस पक्षाचे दक्षिण गोव्यातील उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी गोव्यातील विविध आंदोलनांत भाग घेतलेला असून कोळसाविरोधी आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध पोलिसांत नोंद असलेला हा एकमेव गुन्हा असल्याचे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला पक्षाचे उत्तर गोव्याचे उमेदवार रमाकांत खलप, दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस, पक्षाचे उत्तर गोव्यासाठीचे प्रचार प्रमुख व आमदार कार्लुस फेरेरा व दक्षिण गोव्यासाठीचे प्रचार प्रमुख एल्टन डिकॉस्टा हेही हजर होते.
दोन्ही उमेदवार, तसेच प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते यावेळी जाहीरनामा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
काँग्रेसची आश्वासने
वाढती बेरोजगारी नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही राज्यात स्थानिक युवक-युवतींना सरकारी व खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांत प्राधान्य देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहोत. गेल्या 10 वर्षांपासून बंद असलेला खाण उद्योग विनाविलंब सुरू केला जाईल. गोमंतकीयांना चांगल्या आरोग्यसुविधा उपलब्ध करून देऊ, महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, कलाकारांना व खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी संधी उपलब्ध करून देऊ. केंद्रीय योजनांच्या साहाय्याने पर्यटन उद्योगात स्थानिकांना प्रोत्साहन, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन गुंतवणूक आणणार, युवा उद्योजक तयार करण्यासाठी प्रगत कौशल्य विकास प्रशिक्षण, गोमंतकीयांना दुहेरी नागरिकत्वाचे अधिकार मिळेपर्यंत ‘ओसीआय’ सुविधा सुरू ठेवणार. मुरगाव बंदराचा प्रदूषणमुक्ती क्रुझ टर्मिनल म्हणून विकास करून कोळसा प्रदूषणापासून गोव्याला मुक्त करणार. दाबोळी विमानतळ चालूच रहावा यासाठी विमान कंपन्यांना प्रोत्साहन देणार. किनारपट्टी व मच्छिमार समाज यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणांचे सक्षमीकरण करणार. गोव्यातील सहा नद्यांवरील गोमंतकीयांचे हक्क अबाधित रहावेत यासाठी सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण रद्द करणार. त्याचप्रमाणे गोव्यातील शेतजमिनीचे रक्षण करणे व रुपांतर रोखणे यासाठी कडक कायदे व उपाययोजना करणार मानवी तस्करी तसेच महिला व बालकांवरील अत्याचार तसेच अमली पदार्थांचा वापर यावर आळा घालणार, अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण मिळवून देणार, दिव्यांगांसाठी रोजगाराच्या संधी व सुलभ पायाभूत सुविधा निर्माण करणार, रस्ता अपघातंवर नियंत्रण आणून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करणार, गोव्याच्या शहरीकरणाचा वेग आणि नष्ट होत चाललेल्या मूळ गोव्याच्या कल्पनेवर संसदेत आवाज उठवून केंद्र सरकारचे लक्ष वेधणार, असल्याचे पाटकर यांनी जाहीरनाम्याची माहिती देताना सांगितले.