काँग्रेसच्या 39 जणांच्या कार्यसमितीची घोषणा

0
4

जी-23 मधील अनेक नेत्यांचा समितीत समावेश

यंदाच्या वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक डळ्यांसमोर ठेवून काँग्रेसने नव्या कार्यसमितीची घोषणा केली आहे. त्यामध्ये काँग्रेसवर नाराज असलेले आनंद शर्मा आणि शशी थरूर यांच्यासह जी-23 च्या अनेक नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे. काँग्रेस नेते ए. के. अँटोनी यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. तरीही अँटोनी यांनादेखील काँग्रेसने या कार्यसमितीमध्ये कायम ठेवले आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह एकूण 39 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

काँग्रेसमधील अनेक मोठे निर्णय या समितीकडून घेतले जातात. मात्र, या नव्या समितीत जुन्यापेक्षा फारसा बदल करण्यात आलेला नाही. यादी जाहीर करण्यापूर्वी गेल्या अनेक महिन्यांपासून बैठकांच्या फेऱ्या सुरू होत्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या होत्या. अखेर काल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा केली.
सोनिया राहुल आणि प्रियंका गांधी तिघेही काँग्रेस कार्यसमितीमध्ये आहेत. महत्त्वाचे म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे जी-23 मधील नेते शशी थरूर यांना या समितीत स्थान दिले आहे.

कायम निमंत्रकपदी चोडणकर

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कामकाज समितीवर कायम निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या ह्या निवडीवर गोव्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंद व्यक्त केला आहे.

आपल्या निवडीवर प्रतिक्रिया देताना गिरीश चोडणकर यांनी, एक साधा बूथ कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेस पक्षात काम सुरू केले होते. आता पक्षाचा निर्णय घेण्यासाठीच्या सर्वोच्च समितीवर माझी निवड झाली आहे. याचा मला आनंद होत आहे. मात्र, हे यश आपल्या एकट्याचे नसून गोव्यात बूथ समितीवर तसेच अन्य विविध स्तरांवर काम करताना ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी तसेच केंद्रातील ज्या ज्या नेत्यांनी कार्य करताना सहकार्य व मार्गदर्शन केले त्यांचा आपण ऋणी असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.
या निवडीसाठी सर्व नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा तसेच केंद्रातील ज्या नेत्यांनी वरील समितीवर आपली नियुक्ती केली त्या सर्वांचा आपण ऋणी आहे, असे चोडणकर यांनी काल दै. नवप्रभाला प्रतिक्रिया देताना सांगितले.