काँग्रेसचे दोन्ही उमेदवार उद्या होणार जाहीर

0
21

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची माहिती; नवी दिल्लीत रविवारी होणाऱ्या छाननी समितीच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब

काँग्रेसचे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा रविवारी होण्याची शक्यता गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी काल व्यक्त केली. दरम्यान, केंद्रीय पातळीवरून दोन्ही जागांवर ज्या नेत्यांना उमेदवारी देण्याचा विचार केला जात आहे, त्यांना स्थानिक पातळीवरून विरोध केला जात आहे. परिणामी गटातटाच्या राजकारणामुळे अद्यापही काँग्रेसला उमेदवार निवडणे शक्य झालेले नाही.

काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील निवडणूक छाननी समितीच्या रविवारच्या बैठकीत दोन्ही उमेदवारांची नावे निश्चित करून ती जाहीर केली जाणार आहेत, असे अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
भाजपच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवाराच्या घोषणेनंतर काँग्रेसकडून दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा करून सात दिवस उलटले तरी काँग्रेस उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेलीच नाही. काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारीच्या विषयावर एकमत होत नसल्याने नावांची घोषणा होऊ शकलेली नाही.

काँग्रेस उमेदवाराच्या नावांवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली येथे बुधवारी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उपस्थिती लावली होती. ह्या बैठकीनंतर सुध्दा उमेदवारांच्या नावांवर एकमत होऊ शकले नाही. राज्यातील काँग्रेसमध्ये दोन गट कार्यरत आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी उमेदवार निश्चित करताना अडचण निर्माण होत आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

उत्तर गोव्यासाठी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, सुनील कवठणकर आणि विजय भिके इच्छुक आहेत, तर दक्षिण गोवा मतदारसंघासाठी फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर, विरियातो फर्नांडिस, युरी आलेमाव हे इच्छुक आहेत.

भाजप आघाडीवर; काँग्रेस पिछाडीवर

भाजप आणि रिव्होल्युशनरी गोवन्स या पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी देखील घेतली आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे उमेदवारच जाहीर झालेले नसल्याने त्या तुलनेत पक्ष पिछाडीवर पडला आहे.