Home Featured काँग्रेसचे चाललेय काय?

काँग्रेसचे चाललेय काय?

0

या वर्षी भारतीय जनता पक्षाची सत्ता नसलेल्या तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. तामीळनाडू, जिथे द्रमुक – काँग्रेस आघाडीची सत्ता आहे, पश्चिम बंगाल – जिथे तृणमूल काँग्रेस सत्तेवर आहे आणि केरळ, जिथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणित डावी लोकशाही आघाडी सत्तारूढ आहे अशी ही महत्त्वाची राज्ये आहेत. यंदा आसाम आणि पुडुचेरीतही विधानसभा निवडणूक आहे, परंतु आसाममध्ये भाजपची सत्ता आहे आणि पुडुचेरीतही भाजप एआयएनआरसीसमवेत सत्तारूढ आहे. त्यामुळे ज्या राज्यांनी आपल्याला आजवर हुलकावणी दिली आहे, ती तिन्ही राज्ये हस्तगत करण्यासाठी भाजप यंदा प्रयत्नांची शर्थ करील हे तर स्पष्टच आहे. परंतु एकीकडे भाजपने ही सज्जता ठेवली असताना दुसरीकडे विरोधकांच्या गोटामध्ये मात्र सगळा विस्कळीत कारभार दिसतो. खुद्द प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये तर आपसातली भांडणे चालली आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केरळमध्ये डागलेल्या तोफा, आसाममधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भुपेनकुमार बोराह यांनी आधी दिलेला आणि नंतर मागे घेतलेला राजीनामा, तामीळनाडूत द्रमुकच्या सरकारविरोधात जागावाटपावरून चाललेली तणातणी अशा सगळ्या नकारात्मक गोष्टींमध्ये काँग्रेसची शक्ती वाया चालली आहे असे दिसते आहे. मणिशंकर अय्यर हे वादग्रस्त वक्तव्यांबाबत कुख्यात आहेतच. वीर सावरकरांविरुद्ध एकदा ते असेच बरळले होते. यावेळी त्यांनी आपण ‘राजीवीयन’ आहोत, ‘राहुलीयन’ नव्हे असे सांगून पक्षनेतृत्वालाच शिंगावर घेतलेले दिसते. काँग्रेसचे चार वेळचे खासदार शशी थरूर यांच्यावर ‘त्यांना मोदी सरकारमध्ये विदेशमंत्री व्हायचे आहे’ अशी शेलकी टीका तर त्यांनी केलीच, शिवाय केरळमधील आगामी निवडणुकीच्या तोंडावर डाव्या आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्यावर स्तुतीसुमनेही उधळली. देशातील सर्वोत्तम असे पंचायतीराज मॉडेल केरळमध्ये आहे, पी. विजयन यांचे सरकार पुन्हा निवडून येईल वगैरे स्तुतीसुमने उधळताना अय्यर यांना आपण काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आहोत ह्याचाच विसर पडला की काय असा प्रश्न त्यामुळे तेथील जनतेला पडला आहे. काँग्रेस नेत्यांनी मग अय्यर यांची हजेरी घेतली. त्यावर पवन खेरांना अय्यर कळसूत्री बाहुली काय म्हणाले, खेरा मणिशंकर गेली काही वर्षे काँग्रेसपासून दूर आहेत आणि त्यांना आज पक्षात काहीही स्थान नाही म्हणून त्यांना प्रत्युत्तर दिले. स्वतःला ‘राजीवीयन’ संबोधून राहुल गांधींच्या नेतृत्वावर अय्यर यांनी अप्रत्यक्ष अविश्वास काय दर्शवला. एकूण मणिशंकर अय्यर हे काँग्रेससाठी अस्तनीतला निखारा ठरले आहेत. खाली तामीळनाडूमध्ये सत्ताधारी द्रमुकलाच काँग्रेस नेते बेटकुळ्या दाखवायला लागले आहेत. काँग्रेस नेते मणिकम टागोर यांनी तेथे चालवलेली शेरेबाजी द्रमुक – काँग्रेस संबंधांना मारक ठरू शकते. तेथे द्रमुकची असलेली ताकद काय, आपली काय ह्याचा विचार न करता ज्या खेळी काँग्रेस खेळू पाहत आहे, त्या अंगलट येण्याचीच शक्यता अधिक आहे. तिकडे आसाममध्ये पक्षाचे जुनेजाणते नेते भुपेनकुमार बोराह यांनी खासदार गौरव गोगोईंवर टीकास्र सोडीत पदाचा राजीनामाच देऊन टाकला. शेवटी राहुल गांधींना मध्यस्थी करावी लागली, त्यामुळे तूर्त त्यांनी तो मागे घेतला असला, तरी पक्षात आलबेल नाही हा संदेश ह्या तणातणीतून त्या राज्यात गेला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची कृत्ये आणि वक्तव्ये जर चालणार असतील, तर जनता अशा राजकीय पक्षाकडे विवासाने कशी काय पाहील? परंतु पक्षाचे व्यापक हित पाहण्यापेक्षा आपली वैयक्तिक उणीदुणी काढण्यातच हे नेते धन्यता मानताना दिसत आहेत. काँग्रेसची ही संस्कृतीच बनलेली आहे. गोव्यापासून गुवाहाटीपर्यंत हेच चित्र तर दिसते आहे. पश्चिम बंगालमध्ये तर ममता बॅनर्जींनी काँग्रेसला येत्या निवडणुकीतही चार हात दूर ठेवण्याची नीतीच अवलंबिली आहे. त्यासंदर्भात काही वाटाघाटी, तडजोड करायचे सोडून काँग्रेस ‘इंडिया’ आघाडीतील आपल्या ह्या मित्रपक्षाशीच पश्चिम बंगालमध्ये दोन हात करणार आहे आणि भाजपचा मार्ग सुकर करणार आहे. आपसातील कुरबुरी आणि मतभेदांपलीकडे जाऊन पक्षशिस्तीचा मान राखून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज व्हा हे ज्यांनी सांगायचे, ते राहुल गांधी अजूनही ‘हिट अँड रन’च्या राजकारणातच गुंतलेले दिसतात. नुकत्याच झालेल्या संसद अधिवेशनातील काँग्रेसची कामगिरीही नकारात्मक राजकारणाचीच दिसली. आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती कुठेही दिसत नाही. एकेका राज्याची निवडणूक ही आपल्या पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे हे भान ह्या पक्षाला आणि तिच्या नेत्यांना येणार कधी?