>> ज्येष्ठ नेते रमाकांत खलप यांची माहिती
भाजपने उत्तर तसेच दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांसाठीचे आपले उमेदवार यापूर्वीच जाहीर केलेले असताना काँग्रेसने मात्र अजूनही आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काँग्रेसचे दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार मंगळवारी अथवा बुधवारी जाहीर केले जाण्याची शक्यता ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना व्यक्त केली.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक मंगळवार अथवा बुधवारी होणार असून, या बैठकीत गोव्यातील दोन्ही मतदारसंघांसाठीचे उमेदवार निवडले जाणार आहेत, असे खलप यांनी स्पष्ट केले.
योग्य विचाराअंती पक्षाची केंद्रीय निवडणूक समिती गोव्यातील दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांची निवड करणार आहे. दोन्ही मतदारसंघांसाठीच्या संभाव्य उमेदवारांची अंतिम यादी यापूर्वीच तयार करण्यात आली आहे. त्या यादीतून आता दोन्ही मतदारसंघांसाठीचे उमेदवार निवडले जातील. निवडणूक प्रचाराचे काम हाती घ्यायचे असल्याने स्थानिक नेत्यांचे डोळे उमेदवारांच्या निवडीकडे लागून राहिले असल्याचे खलप यांनी स्पष्ट केले.