भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप व समीर वर्मा यांनी ओर्लियन्स ओपन ‘वर्ल्ड सुपर १००’ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पाचव्या मनांकित कश्यपने पुरुष एकेरीच्या लझतीत आयर्लंडच्या जोशुआ मागी याला २१-११, २१-१४ असे हरविले तर अव्वल मानांकित समीरने स्थानिक खेळाडू थॉमस रॉक्सेल याचे आव्हान २१-१६, २१-१५ असे परतवून लावले. पुढील फेरीत कश्यपचा सामना डेन्मार्कच्या तृतीय मानांकित रासमस गेमके याच्याशी होणार असून समीरला अजून एक स्थानिक खेलाडू लुकास कॉर्वे या आठव्या मानांकित खेळाडूविरुद्ध झुंजावे लागणार आहे.
पहिल्या फेरीत कश्यप व समीर यांना ‘बाय’ मिळाली होती. दुसर्या फेरीत कश्यपने क्रोएशियाच्या झ्वोनोमिर डर्किनजाक याला २१-१६, २१-७ असे तर समीरने रशियाच्या सर्जेई सिरांटला २१-७, २१-९ असे हरविले होते. पुरुष दुहेरीत फ्रान्सिस ऑल्विन व के नंदगोपाळ या सहाव्या मानांकित भारतीय जोडीने पोलंडच्या मिलोस बोचाट व ऍडम वालिना यांना १५-२१, २१-१७, २१-१७ असे हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ‘अंतिम ८’मध्ये त्यांचा सामना तिसर्या मानांकित मार्क लेम्सफस व मार्विन एमिल सिडेल या जर्मन जोडीशी होणार आहे.
कोपराच्या दुखापतीतून पुनरागमन करत असलेल्या आरएमव्ही गुरुसाईदत्त याला २०१५च्या विश्वविजेत्या जान ओ जॉर्जेनसन याच्याकडून २०-२२, २१-१७, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. भारताची नवोदित खेळाडू मुग्धा आग्रे हिला इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्का हिने ११-२१, ९-२१ असे हरवून बाहेरचा रस्ता दाखविला.