कशाला हवी ती पब संस्कृती?

0
212

– सौ. लक्ष्मी जोग
सध्या वृत्तपत्रे, टी.व्ही. चॅनल इतकेच नाही तर अनेक संघटना व घराघरांतून एकाच मुद्यावर तावातावाने चर्चा केलेली ऐकू येते आहे. मुद्दा खराच वादग्रस्त असला तर चर्चा होणे आवश्यकच होते. पण साबांखा मंत्री श्री. सुदिन ढवळीकरांनी स्त्रियांच्या पोशाखाविषयी एक योग्य व स्तुत्य विधान केले आणि चर्चेला ऊत आला. ते विधान आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीला धरूनच होते. ते विधान म्हणजे, ‘‘पर्यटक स्त्रियांनी समुद्र किनार्‍यावर बिकिनीसारखे कपडे घालू नयेत व ‘पब’मध्ये स्त्रियांनी जाऊ नये, तोकड्या कपड्यांत नृत्य करू नये व तोकड्या कपड्यातील नृत्य पाहू नये कारण ते अशोभनीय व आपल्या संस्कृतीला कमीपणा आणणारे आहे’’. या विधानात आक्षेप घेण्यासारखे, विरोध करण्यासारखे व पुतळा जाळण्यासारखे काय आहे? उलट सर्वांनी एकमताने त्याचे स्वागतच करावे असे ते विधान. एका प्रसिद्ध महिला संघटनेनेसुद्धा त्या विधानाचा विरोध करावा ही खरोखरीच दुर्दैवाची गोष्ट म्हटली पाहिजे. ही कुठली मानसिकता? की विरोधासाठी विरोध?
कुणाही माणसाला आपली बहीण, मुलगी ‘पब’ संस्कृतीत वाढावी असे वाटत नाही आणि हेच सत्य मंत्रिमहोदय बोलले. कोणीही भारतीय संस्कृतीचा सुसंस्कृत अभिमानी या विधानाला आक्षेप घेणारच नाही. पाश्‍चिमात्य धार्जिणे, त्या संस्कृतीशी जवळीक असणार्‍या लोकांनीच हे रान उठवले आहे. ज्यांना बिकिनी व ‘पब’चा पुरस्कार करायचा आहे त्यांनी खुशाल आपल्या लेकी-बहिणींना तसे वागण्यास प्रोत्साहन द्यावे, असे म्हणावे तर ज्या समाजात आपण सर्वच राहतो त्या समाजातील लेकी-बाळी त्याचे अनुकरण करतील व आजवर प्राणपणाने जपलेला आपला घरंदाजपणा, मर्यादा, नीतिमत्ता सगळेच धोक्यात येईल. म्हणून अशा विंचवाची नांगी ठेचायलाच हवी.
पूर्वी स्त्रियांनी कसा पोशाख घालावा हे ठरलेले होते. तो कसा होता हे काही मालिकांमधून आपल्याला पाहायला मिळाले. पण व्यक्तिस्वातंत्र्याला भलताच जोर आल्यामुळे स्त्रियांनी कसा पोशाख घालावा हे आपण सांगू शकत नाही. तो जिचा-तिचा प्रश्‍न असतो. फक्त तो वयाला, शरीराच्या ठेवणीला, प्रसंगाला साजेसा असावा अशी किमान अपेक्षा असते. पण माणूस हा अनुकरणप्रिय असतो आणि त्याची स्वाभाविक, साहजिक ओढ, कल वाईट किंवा अनिष्ट गोष्टींकडे असतो. त्यामुळे काही स्त्रिया-मुली ‘‘आपण पारदर्शक, तंग व तोकडे कपडे घातले तर काय झाले? चित्रपटात, टी.व्ही. मालिकांत (काही अपवाद सोडल्यास), जाहिरातीत असे कपडे घातलेले चालतात, मग आम्हीच का घालू नये?’’, असे म्हणत तावातावाने भांडायला येतात. पण त्यांना हे कळत नाही की त्यामुळे त्यांच्या सुरक्षेला धोका उत्पन्न होतो. अनेक चवचालांच्या विषयासक्त नजरा त्यांना न्याहाळत असतात व त्यातूनच ‘निर्भया’ सारखे प्रकार घडू शकतात.
आमची संस्कृती म्हणजे स्त्रीची सभ्यता, लज्जा व मर्यादाशीलता ही आहे. अर्धनग्नता, उच्छृंखलता किंवा नशापान ही नाही. स्त्रीचे आचरण, चारित्र्य, मर्यादेने वागणे हे राष्ट्राचे व समाजाचे भूषण मानले जाते. उलट ‘पब’ संस्कृतीत अनेक प्रकारची अनैतिकता, अंमली पदार्थ, मद्य यांनी उत्तेजित झालेले व धिंगाणा घालणारे मद्यपि लोक असतात. अशा लोकांचे ‘मनोरंजन’ करण्यासाठी त्यांना तरुण मुली हव्या असतात. हे मनोरंजन कशा प्रकारचे असते हे वेगळे सांगायची गरज नाही. अनेक अश्‍लील गैरप्रकार तिथे कसे चालतात हे पोलिसांनी घातलेल्या छाप्यांत उघडकीला आलेले आहे. इतके असून सुद्धा त्या प्रकारांना विरोध केला म्हणून त्या विधानाचा जाहीर निषेध केला जातो. पुतळा जाळतात व ठराविक भागात मंत्री महोदयांना येण्या-जाण्यास प्रतिबंध दर्शविला जातो. याला काय म्हणावे? हे कशाचे लक्षण आहे? परदेशातून येणार्‍या पर्यटक स्त्रिया कशा वेशात येतात व फिरतात ते सर्वांना माहीत आहे. गोव्यात-भारतात आल्यावर त्यांनी इथल्या संस्कृतीप्रमाणे पेहराव करावा असे त्यांना ठणकावून सांगण्याची गरज होती. तेच मंत्री महोदयांनी केले आहे. कारण त्यांना आपल्या तरूण पिढीची व त्यांच्या भविष्याची काळजी आहे. स्त्रियांनी अथवा कुणीही वाट्टेल तसे वागण्याची आमची संस्कृती नाहीच, ज्यायोगे समाज अनैतिकतेकडे घसरेल, बिघडेल, तरूण पिढीवर अनिष्ट परिणाम होईल. हल्ली आनंद व्यक्त करण्याची, प्रेम व्यक्त करण्याची पद्धतच बदलली आहे. पूर्णपणे पाश्चात्त्य वळणावर गेली आहे. पूर्वी कौटुंबिक आनंद गोड-धोड जेवण करून ते एकत्र हास्यविनोदात जेवून साजरा केला जायचा. पण आता? बाहेर उंची हॉटेलात जाऊन, मसालेदार पदार्थांवर ताव मारून व्यक्त केला जातो. पूर्वी सिनेमात चेहर्‍यावर, डोळ्यांतून व हालचालींतून प्रेम व्यक्त केलेलेसुद्धा दिसायचे. पण आता? ते कसे व्यक्त केलेले दाखवतात ते आपण पाहतोच. अगदी रोजच्या मालिकांमधून, जाहिरातींमधून, नृत्य स्पर्धांमधून स्त्रीदेहाचे प्रदर्शन अनिवार्य असल्यासारखे दाखवतात आणि ते सगळे मिटक्या मारीत, टाळ्या वाजवून पाहात असतो. त्यात कुणालाच वावगे दिसत नाही कसें? त्यात भरीत भर म्हणून डान्स बार, पब बरोबरच मोबाइल, इंटरनेट यांनी मुली-मुलांभोवती सगळे फेर धरलेले असतात. मोबाइल, इंटरनेट तर त्यांच्या हातातली खेळणी! या सगळ्यामुळे आपल्या मुलांचे भवितव्य पुढे काय? याची मोठीच भीती आईबापांना सतावते आहे. बाहेर गेलेल्या मुली-बाळी घरी दिसेपर्यंत त्यांच्या जिवात जीव नसतो. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर मा. ढवळीकरांनी मत व्यक्त केले ते चांगलेच झाले, कारण त्यामुळे ‘कोणाला’ ‘काय आवडते’ ते लोकांनाही समजले.
आमच्या दासबोध अभ्यास मंडळात व द्रवीड ब्राह्मण संघ, महिला शाखा यांच्यात चर्चा झाली व श्री. ढवळीकरांच्या वक्तव्याला एकमुखाने सर्वांनी पाठिंबा दिला.
खरे म्हणजे पब, स्पा, मसाज सेंटर, डान्स बार हे सगळे पाश्चात्त्यांचे शौक आहेत. या सर्व प्रकारांना महिलांनी व संस्कृतीप्रेमी लोकांनी कडाडून विरोध करून ही केंद्रे बंद करायला भाग पाडले पाहिजे. आपण आपापसात या सगळ्यावर टीका करतो. आपल्याला ते आवडत नाही. कारण आपली मुले-बाळे बिघडतील अशी भीती आपल्याला असते. पण हे सगळे मनातच असते. त्यामुळे सगळे प्रकार, शिवाय कॅसिनो हे निर्वैधपणे चालू असतात. ते कुणाच्या आशीर्वादामुळे हे सांगायला नको. मला महिला वर्गाचे फार आश्‍चर्य वाटते. त्या सगळे पाहून, ऐकून कशा काय गप्प राहू शकतात? महिलांनी मनात आणले तर एकत्र येऊन त्या बळावर त्या काहीही करू शकतात. महाराष्ट्रातील एका गावातील दारूची सर्व दुकाने त्यांनी बंद करायला भाग पाडलीत ती एकीच्या बळावर! त्यासाठी त्या एक तर खूप सावध व जागरूक असायला हव्यात. त्यांना वाईट गोष्टींबद्दल मनस्वी चीड असायला हवी. त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या संस्कृतीबद्दल, सभ्यतेबद्दल अभिमान असायला हवा. पण हल्ली काय झाले आहे कोण जाणे? कुणाला कशाचेच काही वाटत नाहीसे झाले आहे. अनिष्ट गोष्टी कुणालाही नको असतात तरी त्या चालवून घेतल्या जातात. त्याला ठामपणे विरोध कुणीच करत नाही. टी.व्ही.वर दाखवतात ते सगळेच चांगले, असे म्हणून त्याचे अनुकरण करण्यात धन्यता मानणार्‍या स्त्रिया कमी नाहीत. टी.व्ही.वरील डान्स स्पर्धांमधून कलेच्या नावाखाली जे देहप्रदर्शन अगदी जाहीररीत्या चालते, ते कित्‌पत् योग्य आहे? काय त्यांचे ते कपडे आणि काय त्या ऍक्शन्स!! पाहावत नाहीत. त्या सगळ्यांचे अनुकरण होतेच. काही स्त्रिया, मुली पैसा कमावण्याच्या हव्यासापायी जाहिरातीतसुद्धा अंगप्रदर्शन करतात. काहीही करायची त्यांची तयारी पाहून कंपन्याही आपली हौस भागवून घेतात.
एरवी स्त्रीस्वातंत्र्याचा वगैरे डांगोरा पिटणार्‍या या स्त्रिया त्यावेळी सगळं विसरतात का? आपल्या या प्रदर्शनामुळे पौगंडावस्थेतील मुला-मुलींवर काय परिणाम होतो याचा विचार त्यांच्या मनाला जराही शिवत नाही? एका देश, धर्म व संस्कृतीप्रेमी नेत्याच्या चांगल्या विधानाला आक्षेप घेऊन निषेध केला जातो हे कशाचे लक्षण आहे?