कविवर्य बाकीबाबांच्या वास्तूला अमरत्व हवे

0
171

– लक्ष्मीदास बोरकर

बालकवींच्या ‘गायकीची’ परंपरा सांगत मराठी काव्यक्षेत्रात आपला अवीट ठसा उमटवणार्‍या कविवर्य बाकीबाब बोरकरांची जयंती येत्या ३० नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. या महाकवीच्या घराचे अस्तित्व कालौघात नष्ट व्हायची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी बाकीबाबांच्या सुहृदाने दिलेली ही हाक-

 

‘‘गुड मॉर्निंग बोरी…’’
पुलाच्या दिशेने पहाट समयी फिरायला चाललो असताना इंग्रजीतून दूरदर्शनवरील अभिवादनाच्या धर्तीवर आपणास कोण गुड मॉर्निंग म्हणतंय हे पाहण्यासाठी मी मागं वळून पाहिलं.
बोरीतलं बाकीबाब बोरकरांचं थकलेलं, कसाबसा जीव मुठीत घेऊन उभं असलेलं घर- बाकीबाब जन्मले ते घर साद घालीत होतं. मी माझ्या सकाळच्या भ्रमंतीत ब्रेक घेऊन बाकीबाबच्या त्या टुमदार, बैठ्या घराच्या ओसरीवर आसरा घेतला. याच घरात बाकीबाब लहानाचे मोठे झाले, पद्मश्री बनले, ‘महात्मायान’सारखं महात्मा गांधींच्या जीवनावरील महाकाव्याच्या शिवधनुष्याला हात घालून महाकवीच्या पदावर जाऊन पोचले. याच घराने बाकीबाबांचा मराठी काव्यातील गेय कवितांचा रुणझुण नाद ऐकला. तसाच कोकणीच्या सूरबूस कवितांचा झंकार अनुभवला. भा. रा. तांब्यांना गुरू मानून त्यांच्या कवितेची गायकी पुढे नेली. त्याचप्रमाणे घराजवळ राहणार्‍या पालीस रेंदेराला कोकणीतला गुरू मानून त्यांचं कवित्व समृद्ध केलं. कांताराचे सूर आणि माडाची ‘सूर’ एकाच वेळी काढणारा रेंदेर हा निसर्गाचा सूर पकडणारा जातिवंत कवी. माडावर चढताना त्याची तनू पक्ष्याप्रमाणे हलकीफुलकी बनते, मनही आकाशात स्वैर भरार्‍या मारायला लागतं, आणि ते कांताराच्या रूपाने अभिव्यक्त होतं. अशा रेंदेर कवीला गुरुस्थानी बसविल्यामुळे बाकीबाबच्या कवितेची तनू पक्ष्याप्रमाणे हलकीफुलकी बनली आणि काव्यप्रतिभेने गगनात स्वैर विहार केला. त्यांच्या गेय मराठी आणि कोकणी कवितांत संगीताची ‘पायजणां’ सतत वाजतात. ‘आनंद भैरवी’, ‘चित्रवाणी’, ‘गितार’ या त्यांच्या मराठी काव्यसंग्रहांना दिलेल्या नावावरून बाकीबाबचं संगीताचं ‘पिसे’ दिसून येतं. बाकीला शब्दांचे वेड अगदी लहानपणापासूनचे. लोलकाप्रमाणे तो ते खेळवीत बसायचा आणि तालासुरात घोळवीत राहायचा. ओसरीवरील वार्तालापात घराची म्हातारी सांगू लागली. मी देहभान विसरून ‘बाकीबाबयान’ ऐकत राहिलो.
‘‘बाकीचं दुसरं वेड होतं रंगांचं. काका (म्हणजे बाकीबाबचे वडील भगवंत) फुरसतीच्या वेळात खोलीच्या भिंतीवर चित्रे काढीत. त्यांचे हे चित्रकाम बाकी तासन्‌तास टक लावून बघत असे. त्यांची पाठ फिरली की फडताळातल्या त्यांच्या रंगांच्या पुड्या बाकी समोर मांडीत असे. तांबडा, निळा, चांदवर्खी आणि सोनवर्खी रंग बाकीला भुरळ घालीत. त्याना पाहता पाहता भोवतालच्या जगाचा विसर पडून बाकी एका अद्भुत जगात पोचायचा. त्यात अक्राळ-विक्राळ राक्षस होते, अकटो-विकट भुतेखेते होती, मुकुटमंडित देवगंधर्व होते आणि विशेष म्हणजे लाडिक आणि गोर्‍यागोमट्या पर्‍या होत्या. त्या जगातून त्याला जाग येई ती पाठीत धपाटा घातल्यावर. रंगांशी खेळण्याची बाकीची ती हौस पुरवली गेली नाही याची त्याला खंत होती.
रंगांप्रमाणेच बाकीला स्वरांचंही वेड होतं. त्याचे थोरले मामा पट्टीचे गाणारे होते. त्यांचा आवाज जितका गोड तितकाच पल्लेदार होता. वझेबुवांची त्यांच्यावर विशेष मर्जी होती. ते केशवराव भोसल्यांची आणि गंधर्वांची नाटकातली पदे सही सही उभी करीत. बाकीला ती एकदोनदा ऐकून पाठ होत. बाकी ती वेळीअवेळी म्हणत राहायचा. आरंभी याचं घरात थोडं कौतुक झालं, पण पुढं भजनाची वेळ सोडून अन्य वेळी गळ्यातून तान काढली तर थोबाडीत बसायची. गायला मिळे ते वडीलधारी मंडळी पाहुण्यांसमोर काही म्हणायला सांगत तेव्हा. बाकीला गळा चांगला होता आणि पाठही लवकर होई. त्यामुळे त्याच्या आणि चुलतकाकांघरच्या एकूण एकूण माणसाने आपापले पाठांतर बाकीकडून घटवून घेतले होते. आमचा पात्रीस रेंदेर (भंडारी) देखील आपली कोकणी गीते बाकीकडून म्हणून घ्यायचा. घरच्या करड्या शिस्तीने गांजलेल्या बाकीच्या मनाला हाच एक विरंगुळा असे.
बाकीचं लहानपणाचं ते जग अष्टौप्रहर आणि बाराही मास कवितेने गजबजलेले असे. नागपंचमीपासून भजनी सप्ताह सुरू होई. रोज रात्री चित्रांचे पार निघत आणि दिंडीत भजनाची झुंबड उडे. ‘वारियाने कुंडल हाले| डोळे मोडित राधा चाले’ या गाण्याबरोबर तशी राधा त्याच्या अक्षरशः डोळ्यांसमोर उभी राही. नवरात्रात नाटके आणि कीर्तने, शिगम्यात शिगम्यातली गाणी, असे बारमास गावात काही ना काही चाललेलं असायचं. गणेश चतुर्थीचा मोसम जवळ आला की, जास्तीत जास्त आरत्या पाठ करण्याची अहमहमिका लागायची. दिवस सुरू व्हायचा तो मुळी भूपाळ्यांनी आणि संपायचा तो रात्रीच्या भजनानं. हे भजन आमच्याकडे रोज तीन-तीन तास चाले. आमच्याकडची ही भजनी परंपरा सात पिढ्यांची होती. त्यातली भजनं, पदं अगदी निवडक होती. ती अशी रंगून म्हटली जात की, ‘नाचता नाचता देवाचा गळला पितांबर’ या कडव्याबरोबर देव्हार्‍यातली मूर्ती जिवंत होऊन बाकीच्या डोळ्यांसमोर नाचू लागे.
चातुर्मासात घरच्या चौसोपीवर ‘आर्याभारत’, ‘पांडव प्रताप’, ‘हरिविजय’, ‘भक्तिविजय’ अशा ग्रंथांचे वाचनविवरण चाले. पिकेच्या दिवसांत कानफाटे, वारकरी, वासुदेव असे नाना प्रकारचे लोक दारात काही ना काही गाऊन जात. सारे जग पदांकवितांनी गजबजलेले होते. स्पंजासारखा बाकी त्यात बुडून होता.
आमची घरातली आणि व्यवहारातली भाषा कोकणी. त्यामुळे आरंभी झालेल्या पाठांतराचा अर्थ बाकीला नीटसा कळत नसे. पण पुढंपुढं तो आपोआपच कळत गेला आणि त्यातल्या भावभावनांनी बाकी हेलावून जाऊ लागला. कधीकधी भजन म्हणताना डोळ्यांतून आसवे ओघळत. एकदा बाकीने त्यापायी मारही खाल्ला आहे. एवढासा पोरगा भजनातल्या भावाने सद्गदित होऊ शकतो हे घरच्या वडीलमाणसांना कसं पटावं?
बाकीच्या या असाधारण भावशक्तीमुळे सुखापेक्षा दुःखच त्याच्या वाट्याला जास्त आले. ज्याला-त्याला बाकीला रडविण्यात कोणते सुख वाटत होते, देव जाणे! अशा दुःखानं बाकी बेजार झाला म्हणजे चंद्राशी, ढगांशी, झाडा-झुडपांशी, पाखरां-फुलपाखरांशी आणि देव्हार्‍यातल्या देवाशी बोलून तो जीव हलका करीत असे.’’
बाकीची आजी घरच्या गायीशी, कुत्र्यामांजरांशी, अंगणातल्या तुळशीशी आणि अवेळी ओरडणार्‍या कावळ्याशी माणसाशी बोलल्याप्रमाणे बोलायची आणि त्याना रागे भरायची. देवाशी तर ती तिरीमिरीवर येऊन भांडायची आणि त्याची लाज काढायची. बाकी तिचा लाडका होता. तासभरदेखील बाकी डोळ्यांआड होणे तिला खपत नसे. तिचे हे वागणे पाहून सृष्टीतल्या सार्‍या चराचराला आपले सुख-सुःख समजते असे बाकीच्या मनाने घेतले असावे.
आठ-नऊ वर्षांचा असताना बाकी एकदा काकांच्या बरोबर किरिस्तांव भंडार्‍यांच्या लग्नाला गेला होता. लोकांच्या आग्रहावरून आमच्या पात्रीस भंडार्‍याने तेथल्या तेथे कटाव रचून आपल्या शीघ्र कवित्वाचा नमुना दाखवला. हा प्रकार पाहून बाकी आश्‍चर्याने स्तंभित झाला. आपणही पात्रीसप्रमाणे कविता करावी, असं बाकीच्या मनानं घेतलं.
या इच्छेचं बी एका साध्या घटनेनं अकस्मात उगवलं. नित्यपाठातली भजनातली पदं ठराविक क्रमानं म्हणून झाल्यावर घरातील एका मुलानं एखादे नवे पद किंवा अभंग म्हणावा, असा घरचा नित्याचा परिपाठ होता. त्या दिवशी तो म्हणण्याची पाळी बाकीची होती. दिवस पडला त्यावेळी अकस्मात बाकीला या गोष्टीची आठवण झाली. भजनाची पुस्तकं कपाटात बंद होती. कागद-पेन्सिल घेऊन बाकी घाईघाईनं माडीवर गेला. अभंग लिहून पाठ केला आणि तोच बाकीनं भजनात म्हटला. पण शेवटच्या चरणातल्या ‘बाकी म्हणे’ने आफत आणली. दाजीनी बाकीला आपल्या खोलीत बोलावून घेतलं आणि म्हटलं, ‘संतांच्या अभंगात आपले नाव घालणे पाप आहे.’ आपण अभंग स्वतःच रचलेला आहे असं बाकीनं खूप सांगून पाहिलं, पण त्यांना काही केल्या ते पटेना. शेवटी बाकीने तेथल्या तेथे दुसरा एक अभंग लिहून त्याना खात्री पटवून द्यावी लागली. दाजींना या गोष्टीचे मोठे कौतुक वाटले. ते बाकीला आजीकडे घेऊन गेले आणि झाला प्रकार त्यानी अभिमानाने तिला सांगितला. बाकीला वाटलं होतं, तिलाही आनंद होईल. पण बाकीला पोटाशी घेण्याऐवजी ती चांगलीच बिथरली. संत-वाङ्‌मयावर तिचा फार राग होता. त्याच्याच पायी आजोबांनी मौन घेऊन संसाराकडे पाठ केली होती आणि देवळात कीर्तनाला गेल्या ठिकाणी विहिरीत पडून त्याना अपघाती मरण आलं होतं. बाकीनं अभंग केल्याचं ऐकून देवाला तिनं आणखी चार शिव्या मोजल्या आणि यापुढे अभंग करणार नाही असे त्याच देवापुढे बाकीकडून वचन घेतलं.
अभंग करण्याची उर्मी बाकीने दाबून टाकली; पण कविता केल्याशिवाय त्याला राहवेना. बाकी चोरून कविता करू लागला आणि हाताला मिळतील ती पुस्तकं वाचू लागला. घरात पुस्तकं होती ती म्हणजे ज्ञानेश्‍वरी, तुकारामाची गाथा, दासबोध, स्वामी रामदासांची रचना आणि लहानमोठ्या भजनावल्या. विठोबाअण्णा, सोहिरोबा, कृष्णंभट्ट बांदकर, एकनाथ यांची त्यातली पदे बाकीला निवृत्त होऊन येथे घरी राहायला आला तेव्हासुद्धा आठवत होती. समजोत न समजोत, बाकी ती पुस्तकं वारंवार वाचीत असे. सोहिरोबांच्या पदांच्या दुर्मीळ पुस्तकांची तर दाजीनी बाकीकडून नक्कल करून घेतली होती. घरची पुस्तकं वाचून संपली तेव्हा गावच्या सावकाराघरची पुस्तकं बाकी वाचण्यासाठी आणू लागला. त्यात ‘टेकाड्याचे आनंदगीत’ होते. त्यातल्या ‘असे कसे मज पिसे असे| हे दिसे वसे मनि सुलोचना’ या ओळीने बाकीला एकदोन दिवस भारून टाकले. आधुनिक कवितेशी बाकीची पहिली तोंडओळख करून दिली ती याच पुस्तकाने. इतके दिवस बाकी कविता करीत होता ती ‘वेडेवांकुडे गाईंन परी तुझा म्हणवीन’ या भावनेने. दृष्टी नसलेला तो केवळ आंधळा चाळा होता. भाषा आणि छंद आपलेसे करण्याचा. पण आता आधुनिक कवितेच्या रूपलावण्याने बाकीला आकृष्ट केले. बाकी अशी पुस्तके हुडकू लागला. पण बोरीसारख्या गावात ती त्याला कुठली मिळणार?
बाकी अशा मनःस्थितीत असतानाच कवी दामोदर अच्युत कारे यांचे वडील निवांतपणे लेखन करायला मिळावं म्हणून बाकीच्या घरी येऊन राहिले. माडीवर दिवसरात्र ते आपल्या लेखनात निमग्न असत. बाकीला त्यांच्या दिमतीला देण्यात आलं होतं. कधीकधी आपल्या मुलाच्या हुशारीच्या गोष्टी ते मोठ्या अभिमानाने बाकीला सांगत. ‘केरळ कोकिळा’मधले आपले लेख बाकीला दाखवीत. गुरुवर्य भांडारकरांशी संस्कृत व्याकरणाविषयी आपले कोणते मतभेद आहेत तेही सांगत. त्या वयात बाकीला त्यातले काय कळणार? पण एवढ्या विद्वान लेखकाचा आपल्यावर लोभ आहे एवढी गोष्ट स्वतःवर खूश असण्यास बाकीला पुरेशी होती.
पुढे येथल्या मुक्कामात तेसुद्धा फार आजारी झाले आणि निमित्ताने घरी आलेल्या दा. अ. कार्‍यांशी पहिल्याच रात्री बाकीचा स्नेह जुळला. सारी रात्र त्या दोघांनी एकमेकांना आपल्या कविता म्हणून दाखविल्या. आधुनिक कवितेची जाण कार्‍यांना त्या वयातही फार चंगली होती. त्यांच्याकडूनच बाकीने केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज, टिळक आणि विनायक यांची कविता आणली आणि वाचली. तशी त्यातली बरीचशी कविता बाकीला लगेच पाठ झाली.
पुढं शिक्षणासाठी बाकीला धारवाडला जावं लागलं. तेथे त्याला कवितालेखनाचा छंद कितपत चालू ठेवता आला हे काही समजलं नाही. परंतु घरच्या आर्थिक दुःस्थितीमुळे बाकीला घरी परत यावं लागलं. या काळात यशवंत, गिरीश, माधव ज्युलियन यांची मिळाली ती कविता बाकीनं वाचली. रिकामपणात बाकीला कविता लिहिण्यापरता दुसरा उद्योग नव्हता.
१९३० साली मडगावच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अधिवेशनाची तयारी धुमधडाक्यानं चालू असताना संमेलनाचे एक आघाडीचे कार्यकर्ते आणि सिद्धहस्त लेखक भाई सरदेसाई काही कामानिमित्त दाजींना भेटण्यास घरी आले होते. त्याना कागद हवा होता. काही टाचणे करण्यासाठी खण उघडून त्यानी तो काढला तर तो निघाला बाकीच्या कवितेचा. भाई सरदेसाई हे स्वतः कवी होते. त्यानी अगत्याने विचारपूस करून बाकीला सलगीत घेतलं. मडगाव अधिवेशनाच्या वेळी बाकीचा कवितासंग्रह प्रसिद्ध व्हावा असा आग्रह धरला. बाकीचे मडगावला काव्यगायन घडवून स्वतः फिरून छपाईपुरते पैसे गोळा केले आणि स्नेह्यांना पत्र देऊन बाकीला मुंबईला पाठविले. बाकीला संग्रह छापण्याचा धीर नव्हता, पण भाईंच्यापुढे बाकीला पंख फुटले. ‘माझी आगबोट’ ही कविता बाकीने मुंबईला जाताना बोटीतच लिहिली. मुंबईहून ‘प्रतिभा’ कवितासंग्रहाबरोबर बाकी काही संग्रह घेऊन आला. अधिवेशनात अध्यक्ष-स्वागताध्यक्षांना संग्रहाच्या प्रती दिल्या आणि तो सरळ घरी परतला. फक्त बाकीच्या ‘प्रतिभे’चा जन्म तेवढा या घरात झाला. पुढं त्याच्या ‘प्रतिभे’ला पंख फुटून कवितेच्या गगनात स्वैर संचार केला.
नावलौकिक मिळविला तो सगळा या घराच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर. ‘प्रतिभा’च्या पाठोपाठ भारत गौरव ग्रंथमालेने ‘जीवन संगीत’ हा त्याचा दुसरा कवितासंग्रह प्रसिद्ध केला. बाकीचा ‘बाकीबाब’ झाला. त्याच्या अनेक कवितासंग्रहांचे अपार कोडकौतुक झाले. बाकीने कवितेप्रमाणे इतर साहित्यक्षेत्रातही मोलाचा हातभार लावला. पुण्यात आकाशवाणीवर हुद्द्याची जागा स्वीकारून बाकीबाबाच्या कवितेने स्वराकाशात स्वैर भरारी मारली आणि पणजी केंद्रावर गोव्याच्या रसिकांची सेवा करीत निवृत्ती पत्करल्यानंतर पूर्ववत याच घरात बाकी आश्रयाला आला. बाकीच्या सुख-दुःखांना सांगात करीत कविता अखंड त्याच्याबरोबर चालत राहिली. तिला माणसांच्या स्नेहाची वाण कधीच पडली नाही. हा स्नेहच बाकीचे आजवरचे पोषण व शिक्षण ठरला होता.
निवृत्तीनंतरचं जीवन येथे बोरीच्या वयोवृद्ध घरात घालविणं म्हणजे बाकीला ‘जलाविण मासोळी’सारखं वाटायला लागलं. बाकी माणसांच्या स्नेहाचा भुकेला होता. तो त्याला येथे मिळेनासा झाल्यावर नाईलाजास्तव बाकी पणजीला राहायला गेला. बाकीविणा घर म्हणजे बाकी शून्य. कवी बाकीबाब बोरकरांचे घर म्हणून अनेक बाकीप्रेमी या वास्तूला भेट देतात. जाता-येताना घर दिसलं की विनम्र भावाने नमस्कार करतात. तेव्हा माझ्या हडकुळ्या अंगावर मूठभर मांस चढते. बरं वाटतं. परंतु, भविष्यकाळाची चाहूल लागताच भीतीनं थरथर कापायला होतं. बाकीबाबासारख्या असामान्य प्रतिभेच्या महाकवीच्या नावाशी निगडित असलेली ही वास्तू काळाच्या वरवंट्याखाली भरडून कायमची दृष्टीआड झाली तर? ब्रिटिश लोकांनी म्हणे त्यांच्या महान साहित्यिकांचे- शेक्सपियरचे- राहते घर जतन करून ठेवलेय. पर्यटक आवर्जून ते घर पाहायला जातात. गोव्याच्या नंदनवनाला भेट द्यायला येणारे पर्यटकही उद्या महाकवी बाकीबाब बोरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेलं घर पाहायला बोरीला आले तर त्याना बोरकरांचे स्मृतीसदन पाहायला मिळेलच याची शाश्‍वती कुणी द्यावी? म्हणून पहाटेच्या वेळी फिरायला जाताना हटकलं ते एवढ्याचसाठी. बाकीबाबच्या सर्वांगानी फुललेल्या काव्यविश्‍वाचा वारसा पुढच्या पिढ्यांना मिळावा म्हणून बाकीबाबच्या कविताप्रेमींनी वृद्धावस्थेने थकलेल्या या वास्तूचा डोलारा कोसळू न देता, त्याचं बाकीबाब बोरकर अभ्यासकेंद्रात रूपांतर करण्यासाठी पुढे सरवायचं असं आवाहन करण्यासाठीच- ‘गुड मॉर्निंग बोरी, गुड मॉर्निंग बाकीबाब. लॉंग लिव्ह बाकीबाब.’
(पुनर्मुद्रित)