‘कळसा-भांडुरा’साठी पर्यावरण दाखले द्या

0
7

>> दिल्लीतील भेटीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी; गोव्यात म्हादई जलतंटा विषय पुन्हा तापणार

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नवी दिल्लीत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पंतप्रधानांकडे म्हादई नदीवरील वादग्रस्त कळसा-भांडुरा पाणी प्रकल्पाच्या कामासाठी पर्यावरण दाखले देण्याची विनंती पुन्हा एकदा केली. यावेळी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची उपस्थिती होती. कळसा-भांडुरा पाणी प्रकल्पासाठी आवश्यक दाखले व परवाने कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहेत, त्यासाठी कर्नाटकने पुन्हा एकदा हालचाली गतिमान केल्याने गोव्यात म्हादईचा पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.

दोन दिवसांपूर्वी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन म्हादई नदीवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाला पर्यावरण दाखले देण्याची विनंती केली होती. त्यानंतर, काल कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने कर्नाटक सरकारकडून म्हादई नदीचे पाणी वळविण्याच्या मोहिमेला गती दिल्याचे दिसून येत आहे. तथापि, गोवा सरकार मात्र कर्नाटकचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी फारशी आक्रमक भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे. म्हादई प्रकरण न्यायप्रविष्ट असून, गोव्याची बाजू भक्कम असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे.
याशिवाय कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे ‘मेकेदातू’ पाणी प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालय आणि पर्यावरण मंत्रालयाची मान्यता मिळावी, अशी मागणी केली.

तसेच, अल्पकालीन कृषी कर्ज मर्यादा वाढवणे, 10,000 कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य आणि इतर काही मागण्या सिद्धरामय्या यांनी पंतप्रधानांकडे केल्या आहेत. मध्य कर्नाटकातील दुष्काळी शेतजमिनींना सिंचन योजनेसाठी 5300 कोटी रुपये देण्याची विनंती केली आहे. हा प्रकल्प 2023-2024 पासून प्रलंबित आहे, अशी माहिती मिळाली आहे.

प्रलंबित परवान्यांमुळे कर्नाटकचे घोडे अडले

कर्नाटक सरकारने म्हादई नदीवरील कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी पर्यावरण दाखले मिळविण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे अर्ज केला आहे. गोवा सरकारने कर्नाटकच्या म्हादईचे पाणी वळविण्याचा प्रयत्नांना विरोध केला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रालयाकडून पर्यावरण दाखला देण्याचा निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे थेट पंतप्रधानांची भेट घेत कर्नाटक सरकारने म्हादईचे पाणी वळविण्याच्या प्रयत्नांना गती देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

कुणाचीही भेट घेऊ द्या; चिंता नको : शिरोडकर

म्हादईचे पाणी वळविण्याचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात आमची बाजू भक्कम आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कुणाचीही भेट घेतली, तरी काळजी करण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल व्यक्त केली.

शिवकुमार काय म्हणाले?

कर्नाटकातील वाढत्या पाणी गरजा पूर्ण करण्यासाठी, विकासाला चालना देण्यासाठी आणि वन्यजीव कल्याण वाढवण्यासाठी कळसा-भांडुरा प्रकल्पातून पाणी वळविण्यास मान्यता देण्याची मागणी डी. के. शिवकुमार यांनी केली.