कळंगुट टोळीयुद्धप्रकरणी चार संशयितांना अटक

0
37

>> मंगळवारच्या सुरी हल्ल्यात सुरक्षारक्षक जखमी

नाईकवाडा-कळंगुट येथे एका सुरक्षारक्षकावर प्राणघातक हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघा हल्लेखोरांना कळंगुट तसेच पेड़णे पोलिसांनी अटक केली. कळंगुट मार्केटमध्ये मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली होती.

मंगळवारी रात्री पूर्ववैमनस्यातून झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात पर्वरी येथील स्वप्निल रेडकर (३०) हा सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला. या हल्ल्यात सहभागी झालेला टारझन पार्सेकर (नागोवा-बादेश), सूर्यकांत कांबळी (शंकरवाडी-ताळगाव), इमरान बेपारी (सांताक्रूझ-मेरशी) तसेच सूरज शेट्ये (मेरशी) या चौघाही संशयितांना कळंगुट तसेच पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची रवानगी कळंगुट पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास संशयित टारझन हा सहकारी मित्र इमरान, सुरज तसेच सूर्या यांच्यासह नाईकवाडा कळंगुट येथे घटनास्थळी दाखल झाला. तेथे कामावर असलेल्या स्वप्निल रेडकर यांना गाठून सर्वप्रथम त्यांनी त्याच्या डोळ्यांत काळ्या मिरीची पूड फेकून त्यांना जायबंदी केले. सूर्यकांत याने स्वप्निलच्या उजव्या पायावर कोयत्याने वार केला. तसेच त्याच्या पोटावर लोखंडी सळीने वार केले. टारझन हा स्वतः हाती तलवार घेऊनच घटनास्थळी आला होता, असे स्वप्निल यांनी तक्रारीत म्हटले आहे.

तलवार जप्त, जखमींवर उपचार
या हल्ल्याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या कळंगुट पोलिसांनी संशयित टारझन याला जागीच ताब्यात घेतले तर अन्य तिन्ही संशयितांना ते बुधवारी पहाटे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पेडणे येथे अटक केली. पोलिसांनी हल्ल्यासाठी वापरलेली तलवार जप्त केली असून सर्व आरोपींना गजाआड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रापोझ यांनी दिली. स्वप्निल रेडकर यांच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

टोळीयुद्ध नसल्याचा
पोलीस अधीक्षकांचा दावा

मंगळवारी कळंगुट येथे दोन गटांत झालेली मारामारी टोळी युद्ध नसल्याचा खुलासा काल उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोभीत सक्सेना यांनी केला. काही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये झालेले ते भांडण होते, असे ते म्हणाले. ह्या भांडणाला टोळी युद्ध म्हणता येणार नसल्याचा खुलासा त्यांनी केला.

काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक टिटो क्लबजवळ आले होते. तेथे त्यांचे अन्य काही गुंडांशी भांडण झाले, असे सांगून हे टोळीयुद्ध नव्हे, असा दावा सक्सेना यांनी केला.

या प्रकरणाची तपशीलवार चौकशी केली जात असून त्यातून सर्व काही उघड होणार असल्याचे ते म्हणाले. पण प्राथमिक स्वरूपाच्या चौकशीत हे टोळीयुद्ध नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे ते म्हणाले. यावेळी हल्लेखोरानी कोयते व सुर्‍यांचा वापर केल्याचे ते म्हणाले.
याप्रकरणी नागोआ येथील गुंड टारझन पार्सेकर तसेच इम्रान बेपारी, सूर्यकांत कांबळी व सूरज शेट्ये या तिघा जणांनाही अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या तिघांना ते मुंबईला पळून जाण्याच्या बेतात असताना पेडणे येथे अटक केल्याचे त्यांनी सांगितले. इम्रान बेपारी हा सराईत गुन्हेगार असून हल्लीच त्याची जामिनावर सुटका झाली होती, अशी माहितीही सक्सेना यांनी दिली.