कल्याणकारी योजनांचा गरजूंना लाभ : साळकर

0
2

राज्यपालांचे अभिभाषण अभ्यासपूर्ण असून सरकारच्या सर्व कामांची योग्य दखल घेतली आहे. राज्य सरकारचे काम अंत्योदय, ग्रामोदय, सर्वोदय या तत्त्वावर सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ गरजूंना मिळवून दिला जात आहे, असे आमदार कृष्णा साळकर यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठराव मांडल्यानंतर बोलताना काल सांगितले.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे राज्यातील विविध भागात फिरून सर्वसामान्य लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांनी राज्य सरकारने केलेले काम जवळून पाहिले आहे. राज्य सरकारने गृहरक्षक म्हणून चांगली सेवा देणाऱ्यांना पोलीस दलात काम करण्याची संधी दिली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, जी-20 चे यशस्वी आयोजन केले. केौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे, असेही आमदार साळकर यांनी सांगितले.

अमली पदार्थ : युवकांना
समुपदेशनाची गरज : शेट्ये

राज्यातील पोलीसाचे काम व्यवस्थित आहे. अमली पदार्थांच्या व्यवहाराकडे वळणाऱ्या स्थानिकांना समुपदेशनाची गरज आहे. स्थानिक युवक अमली पदार्थांच्या व्यवहारातील एजंट बनू नये म्हणून योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले. राज्यात रस्ता वाहतुकीबाबत जनजागृतीची गरज आहे. राज्यातील अपघात प्रवण क्षेत्रांमध्ये सुधारणा करून कायम स्वरूपी तोडगा काढला पाहिजे. केवळ वाहन चालकांना दंड ठोठावून काहीच साध्य होणार नाही. राज्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वी पार पडली. तथापि, डिचोली सारख्या भागात चांगले सुसज्ज मैदान नाही. राज्यात चांगले खेळाडू तयार करण्यासाठी ग्रामीण भागात क्रीडा सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे, असे आमदार शेट्ये यांनी सांगितले.

पारंपरिक व्यवसायांना
ऊर्जितावस्था : लोबो

राज्यपालांनी अभिभाषणात पंतप्रधान मोदी यांचे विकसित भारताचे व्हीजन मांडले आहे. सामान्य नागरिकांच्या विकासासाठी कार्य सुरू आहे. युवकांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिक व्यवसायांना उर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले. 1
गोवा राज्य आरोग्य क्षेत्रात आघाडीवर आहे. सामाजिक आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत साधनसुविधा आणखी वाढविण्याची गरज आहे. युवा वर्गाला कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यावर भर दिला पाहिजे. युवकांना दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. राज्यातील मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी गोशाळा वाढविण्याची गरज आहे. राज्यातील मच्छिमारी समाजातील युवक दुसऱ्या व्यसायाकडे वळू लागले आहेत. स्थानिक मच्छीमार व्यवसायापासून दूर जाण्याची कारणे शोधून उपाययोजना करण्याची गरज आहे, असेही आमदार लोबो यांनी सांगितले.

युवकांचा कौशल्य
विकास : प्रेमेंद्र शेट

कौशल्य विकासाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्याचे चांगले कार्य केले जात आहे. विश्वकर्मा योजनेखाली प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. पारंपरिक व्यवसायाला नवी दिशा मिळणार आहे, असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.
भाजपच्या कार्यकाळात राज्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. नवीन झुआरी पुलामुळे गैरसोय दूर झाली आहे. सरकारी योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्यात येत आहेत, असे आमदार राजेश फळदेसाई यांनी सांगितले.